त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती वैशाली बुद्धविहारात उत्साहात साजरी
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती वैशाली बुद्धविहारात उत्साहात साजरी
निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :
त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२८ वी जयंती वैशाली बुद्धविहार, पंचशील नगर, परळी येथे मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण रमाताई उबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामूहिक त्रिशरण व पंचशील घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रानबा गायकवाड यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार वेंकटेश मुंडे, भैय्यासाहेब आदोडे, सचिन रणखांबे, नवनाथ डाने, संपादक बालाजी जगतकर, प्रा. प्रवीण फुटके, दत्ता सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून माता रमाई यांच्या त्यागमय जीवनकार्याचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक राजलक्ष्मी विकास जाधव (माऊंट लिटरा झी स्कूल, परळी) हिने पटकावला.
द्वितीय क्रमांक मानसी नवनाथ शेरकर (जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, मोहा) हिने मिळवला, तर
तृतीय क्रमांक रिया रावसाहेब जगतकर (कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला (कनिष्ठ) महाविद्यालय, परळी वैजनाथ) हिने पटकावला.
तसेच प्रोत्साहनपर बक्षिसे प्रतिज्ञा बाबासाहेब रोडे (मिलिंद ज्युनिअर महाविद्यालय, परळी), आर्वी आशिष आरगडे (संस्कार प्राथमिक शाळा, परळी) आणि गीता रामकिशन तिडके (जिल्हा परिषद शाळा, लाडझरी) यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे भारदस्त सूत्रसंचालन बोधीचार्य आनंद तूपसमुद्रे यांनी केले, तर प्रास्ताविक बोधिराज सोनवणे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रमाई जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक महादेव रोडे, उपाध्यक्ष मेजर संतोष वावळे, सचिव बोधिराज सोनवणे, सांस्कृतिक अध्यक्ष श्रावण वाघमारे, कोषाध्यक्ष राम डोबे, मिरवणूक अध्यक्ष नागसेन सोनवणे, शुभम भोले आदींसह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास पुरस्कारप्राप्त विद्यार्थी, पालक, तसेच परिसरातील उपासक-उपासिका, बालक-बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
Comments
Post a Comment