शांतीवन स्मशानभूमीची दयनीय अवस्था :नगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे अंत्यविधीही हालअपेष्टांत

शांतीवन स्मशानभूमीची दयनीय अवस्था :नगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे अंत्यविधीही हालअपेष्टांत

बोअर बंद – पाण्याविना अंत्यसंस्कार | रस्ता अरुंद – काटेरी झुडपांचा विळखा | न. प. प्रशासन ढिम्म
परळी प्रतिनिधी :परळी शहरातील परिसरातील सर्वात मोठी असलेली शांतीवन सार्वजनिक स्मशानभूमी सध्या नगरपालिकेच्या बेजबाबदार व निष्क्रिय कारभाराचे जिवंत उदाहरण ठरत आहे. तब्बल सात एकर क्षेत्रफळात उभारलेली ही स्मशानभूमी आज दुर्लक्ष, असुविधा आणि अव्यवस्थेचा अड्डा बनली असून मृतांच्या अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना अनंत अडचणीला परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी उभारलेल्या ओट्यांवर आजतागायत लोखंडी जाळ्या बसवण्यात आलेल्या नाहीत. नगरपालिकेला वारंवार सूचना देऊनही याकडे डोळेझाक करण्यात आली आहे. परिणामी, अंत्यविधी करताना नागरिकांना जीव मुठीत धरून विधी करावे लागत असून प्रशासनाची ही गंभीर बेपर्वाई कधी जीवघेणी ठरणार, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
स्मशानभूमीच्या मोकळ्या जागेत काटेरी झाडे, झुडपे व गवत प्रचंड प्रमाणात वाढले असून प्रवेशद्वारापासून अंत्यसंस्काराच्या ठिकाणापर्यंत जाणारा रस्ता अक्षरशः गायब झाला आहे. रस्ता रुंदीकरण करून रस्त्यावर आलेली झाडे-झुडपे तातडीने कापणे आवश्यक असताना, नगरपालिकेचे अधिकारी मात्र हातावर हात ठेवून बसले आहेत. अंत्ययात्रेला वाट काढावी लागणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत.
अंत्यसंस्कारानंतर स्नान व धार्मिक विधीसाठी बसवलेल्या पाण्याच्या टाक्या केवळ नावापुरत्या उरल्या आहेत. स्मशानभूमीतील बोअर पूर्णपणे बंद असून, पाण्याचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका जाणीवपूर्वक कानाडोळा करत आहे. शोकाकुल कुटुंबांना पाण्यासाठी इतरत्र धाव घ्यावी लागत असल्याने नगरपालिकेच्या संवेदनशून्य कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रात्रीच्या वेळी अंत्यविधी करणे म्हणजे अंधाराशी झुंज देण्यासारखे झाले आहे. स्मशानभूमीत पुरेशी पथदिवे व विद्युत रोषणाई नसल्याने नागरिकांना अंधारात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.मरणानंतरही माणसाला शांतता मिळू नये, हीच का नगरपालिकेची भूमिका? असा रोखठोक प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.शांतीवन स्मशानभूमीचे तात्काळ सुशोभीकरण, साफसफाई, डागडुजी, नादुरुस्त बोअर दुरुस्ती, नियमित पाण्याची व्यवस्था, संपूर्ण विद्युत रोषणाई, रस्ता रुंदीकरण व अंत्यसंस्काराच्या ओट्यांवर लोखंडी जाळ्या बसवणे या मागण्या तातडीच्या आहेत. हा प्रश्न केवळ सुविधांचा नसून मानवी प्रतिष्ठेचा आणि संवेदनशीलतेचा आहे. तरीही नगरपालिका अजून किती काळ गाढ झोपेत राहणार? असा संतप्त सवाल उपस्थित करत तात्काळ ठोस कारवाईची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी