बीड शहरासाठी बिंदुसरा प्रकल्पातून नवीन पाणी पुरवठा योजना राबवावी
बीड शहरासाठी बिंदुसरा प्रकल्पातून नवीन पाणी पुरवठा योजना राबवावी
भाजप गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागरांसह शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बीड (प्रतिनिधी)
दि.४ : शहरातील सध्याचा विस्कळीत पाणीपुरवठा, उन्हाळ्यात दरवर्षी भेडसावणारी पाणीटंचाई, पुरवठ्याच्या नियोजनातील त्रुटी आणि येत्या उन्हाळ्यातील संभाव्य अडचणी लक्षात घेऊन आता बीड शहरासाठी बिंदुसरा प्रकल्पातून नवीन अतिरिक्त पाणीपुरवठा योजना तातडीने प्रस्तावित करून कामांना गती द्यावी, अशी मागणी भाजपच्या गटनेत्या व नगरसेविका डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन मंगळवारी (दि.३) केली. या मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सध्या बीड शहराला बिंदुसरा प्रकल्पातून अंशतः पाणीपुरवठा होत असून तो पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी शहरालगत घुमरे वस्ती व धानोरा रोड मार्गे नवीन पाणीपुरवठा योजना उभारणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. तसेच, नव्याने विकसित झालेल्या वस्त्यांसाठी स्वतंत्र पाण्याच्या टाक्या व वितरण व्यवस्था उभारण्यात यावी. सध्या शहरातील अनेक भागात ८ ते १५ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात पाण्याची उपलब्धता असूनही योग्य नियोजनाच्या अभावामुळे पुरवठा विस्कळीत होत असल्याचे सांगत सर्व भागांना नियमित व समान पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यासोबतच अमृत अटल पाणीपुरवठा योजना १.० अंतर्गत उर्वरित कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित कंत्राटदारांकडून तातडीने पूर्ण करून सर्व झोनमधील वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी निर्देश देण्यात यावेत. तसेच, महावितरण कंपनीची बीड नगरपरिषदेकडे असलेली थकबाकी हा जटील प्रश्न सोडवून पाणीपुरवठा योजनांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी केली आहे. यावेळी मुख्याधिकारी शैलेश फडसे, माजी नगरसेवक गणेश वाघमारे, रवी कदम, नगरसेवक सय्यद मुस्तफा, नगरसेविका मीना जाधव, समीक्षा शेटे, सावित्री साखरे, भाग्यश्री तांबारे भाग्यश्री देशपांडे, ॲड.नागेश तांबारे, विकास जोगदंड, संपादक साहस आंदोडे, ॲड.गोविंद शिराळे, बाळासाहेब गुजर, सागर देशपांडे, मंगेश धोंगडे, सनी माने, राकेश जाधव, नितीन साखरे, माणिक वाघमारे, विशाल राऊत यांच्यासह भाजपचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
मालमत्ता नोंदणी मोहिमेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
बीड शहराचा झपाट्याने विस्तार होत असून नव्या मालमत्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या सर्व मालमत्तांची नोंद नगरपरिषदेच्या अभिलेखात असणे आवश्यक असल्याने व्यापक मालमत्ता नोंदणी (असेसमेंट) मोहीम राबविण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपच्या गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी केली आहे. मालमत्ता नोंदणी पूर्ण झाल्यास नगरपरिषदेचा महसूल वाढून शहरातील विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यास मदत होईल. या मोहिमेसाठी सुमारे एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment