स्वच्छ, सुंदर व शिस्तबद्ध बीडसाठी ‘संत गाडगेबाबा स्वच्छता मोहीम : मिशन 52’ ला सुरुवात
चला स्वच्छतेशी प्रेम करू”
स्वच्छ, सुंदर व शिस्तबद्ध बीडसाठी ‘संत गाडगेबाबा स्वच्छता मोहीम : मिशन 52’ ला सुरुवात
बीड प्रतिनिधी :
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेम केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न ठेवता, आपल्या शहरावर, सार्वजनिक आरोग्यावर आणि भावी पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी व्यक्त करण्याचा संकल्प बीड शहराने केला आहे. “चला स्वच्छतेशी प्रेम करू” या संकल्पनेतून संत गाडगेबाबा विशेष स्वच्छता मोहीम – ‘मिशन 52’ चा भव्य शुभारंभ दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी बीड शहरात मा. आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते होत असून, या मोहिमेच्या माध्यमातून शहर स्वच्छ, सुंदर व शिस्तबद्ध करण्यासाठी प्रशासनाने कडक आणि निर्णायक पावले उचलली आहेत, अशी माहिती बीड नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य सभापती मा. शेख निजाम साहेब यांनी दिली.
स्वच्छता, शिस्त आणि नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या दिवंगत स्व. अजितदादा पवार यांचे स्वच्छ शहराचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणातून आणि कार्यातून स्वच्छतेबाबतची स्पष्ट दिशा महाराष्ट्राने अनुभवली असून, बीड शहरही त्यांच्या विचारांप्रमाणे स्वच्छ, आरोग्यदायी आणि शिस्तबद्ध व्हावे, हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
स्व. अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यांच्या बीड शहरात आगमनापूर्वी शहर स्वच्छ, सुव्यवस्थित आणि शिस्तबद्ध दिसावे, तसेच अजितदादांनी बीडकरांना दिलेला स्वच्छतेचा शब्द पूर्ण व्हावा, या भावनेतून ‘मिशन 52’ प्रत्यक्ष अंमलात आणले जात आहे.
ही विशेष स्वच्छता मोहीम मा. आमदार अमरसिंह पंडित, आमदार विजयसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, प्रतिनिधी शेख मुजीबभाई, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारूक पटेल तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नगरपरिषद प्रशासन, स्वच्छता व आरोग्य विभाग, बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकारी पूर्ण क्षमतेने सहभागी झाले असून, शहराच्या प्रत्येक भागात प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे.
‘मिशन 52’ अंतर्गत बीड शहरातील सर्व प्रभागांमध्ये स्वच्छतेबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबण्यात आले असून, रस्ते, पदपथ, चौक, सार्वजनिक जागा आणि नाल्यांवरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासाठी कडक कारवाई केली जाणार आहे. नाल्यांवरील अनधिकृत जाळ्या, पायऱ्या, स्लॅब व बांधकामे कोणताही अपवाद न ठेवता काढण्यात येणार असून, पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर थेट दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे साहित्य, टपऱ्या व फलक हटवून शहराचे रस्ते मोकळे आणि सुरक्षित केले जाणार आहेत.
या मोहिमेत शहरातील सर्व महापुरुषांचे पुतळे, स्मारके व चौकांची स्वच्छता व देखभाल करण्यात येणार असून, मुख्य बाजारपेठा, भाजी मंडई, मांस-मच्छी बाजार, बसस्थानक, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, दवाखाने आणि सार्वजनिक शौचालय परिसरांची सखोल स्वच्छता केली जाणार आहे. नाल्यांची मशीनद्वारे सफाई, साचलेला गाळ काढणे, दुर्गंधी व डासोत्पत्ती रोखण्यासाठी फवारणी, तसेच प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
रस्त्यावर, नाल्यात किंवा मोकळ्या जागेत कचरा टाकणाऱ्यांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व अस्वच्छता करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, नियमबाह्य कचरा टाकणारी दुकाने, हॉटेल्स व आस्थापनांवर नोटीस व सील कारवाई केली जाणार आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी केवळ आवाहन नव्हे तर प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या विशेष मोहिमेत मा. जयतुला खान पठाण, मा. श्रीमती मीना गोडसे, मा. अफसर सर, मा. मोमिन खुर्शिद आलम, मा. नंदकुमार पिंगळे, मा. शेखा आतर, मा. श्रीमती भाग्यश्री देशपांडे तसेच बीड नगर परिषदेतील सर्व नगरसेवक सक्रिय सहभाग घेत असून, प्रशासन व लोकप्रतिनिधी संयुक्तपणे शहराच्या स्वच्छतेसाठी मैदानात उतरले आहेत.
१० ट्रॅक्टर, २ जेसीबी, शंभरहून अधिक स्वच्छता कर्मचारी, आरोग्य व स्वच्छता विभागांचे संयुक्त पथक आणि सामाजिक संस्था, विद्यार्थी व स्वयंसेवकांच्या सहभागातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे केवळ शहर स्वच्छ करणे नव्हे, तर नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जबाबदारी, शिस्त आणि शहराविषयी आपुलकी निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे.
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेम फुलांपुरते न ठेवता, स्वच्छतेवर प्रेम करण्याचा आणि स्वच्छ बीड घडवण्याचा ठाम निर्धार करूया, अशी भावनिक आणि स्पष्ट साद बीड नगर परिषदेने शहरवासीयांना घातली आहे.
Comments
Post a Comment