धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दिपकभाऊ बो-हाडे यांना पाठिंबा देण्यासाठीलिंबागणेश पंचक्रोशीतील धनगर बांधव मुंबईकडे रवाना होणार
लिंबागणेश : (दि. १७)
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दिपकभाऊ बो-हाडे हे दि. २१ जानेवारीपासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या या न्याय्य मागणीला पाठिंबा देण्यासाठी मराठा सेवक डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली आज दि. १७ रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य प्रवेशद्वारावर धनगर समाजासह अठरापगड जातीतील समाजबांधव मुंबईकडे रवाना होणार असल्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
“येळकोट येळकोट जय मल्हार”,
“जय मल्हार बोलो, मुंबई चलो”,
“दिपकभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है”,
“आरक्षण आमच्या हक्काचं आहे, नाही कोणाच्या बापाचं”
अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला.
दिपकभाऊ बो-हाडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणाऱ्या धनगर समाजाच्या आरक्षणासाठीच्या न्याय मागणीला मराठा समाजासह अठरापगड जातीतील समाजबांधवांचा जाहीर पाठिंबा असून, सर्व समाजबांधवांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा सेवक डॉ. गणेश ढवळे यांनी केले आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी बीड, पोलीस अधीक्षक बीड तसेच नेकिनूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
यावेळी सरपंच बालासाहेब जाधव, राजेभाऊ गिरे, कल्याण वाणी, रविंद्र निर्मळ, सुरेश निर्मळ, बाळासाहेब मुळे, बाळासाहेब मोरे पाटील, अनंतकाका मुळे, हरिओम क्षीरसागर, संदीप मुळे, शहादेव धलपे, गणपत तागड, रामदास मुळे, रामचंद्र मुळे,महावीर मुळे, संतोष वाणी, विनायक वाणी, संजय सुकाळे, प्रविण मुळे, जीवन मुळे, रोहन तागड, रामराजे मुळे, नवनाथ मुळे, केशव गिरे, कल्याण कोकाटे, दत्ता मुळे, आप्पा मुळे अमोल पितळे, बंडू ढगारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment