केज–बीड रस्त्यावर खड्यात पडून तरुण १२ तासांहून अधिक काळ बेसुध; ढाकणे दाम्पत्यामुळे जीव वाचला
केज–बीड रस्त्यावर खड्यात पडून तरुण १२ तासांहून अधिक काळ बेसुध; ढाकणे दाम्पत्यामुळे जीव वाचला
अपघातस्थळी कोणाच्याच नजरेस न पडल्याने रक्तस्रावातच पडून होता तरुण
केज प्रतिनिधी : - केज–बीड रस्त्यावर आंबाळाच्या बरडाजवळ दुचाकी अपघात होऊन एक तरुण तब्बल १२ तासांहून अधिक काळ खड्यात बेसुध अवस्थेत पडून असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याची अवस्था नाजूक बनली होती. मात्र, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नवनाथ ढाकणे व सौ. आशाताई बाजीराव ढाकणे यांच्या सतर्कतेमुळे वेळेत मदत मिळून त्याचा जीव वाचला. जखमी तरुणावर सध्या अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत.
केज–बीड रोडवरील आंबाळाच्या बरडाच्या पूर्वेस असलेल्या पुलाजवळ रस्त्याच्या कडेला चार फूट खोल खड्यात पॅशनप्रो (MH 24 AC 1275) ही मोटारसायकल पडलेली आढळून आली. या ठिकाणी धिरज भवर (रा. हरीनारायण आष्टा, ता. आष्टी) हा तरुण गंभीर जखमी अवस्थेत बेसुध पडलेला होता. प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी रात्रीच्या सुमारास लातूरहून आष्टी तालुक्यातील हरीनारायण आष्टा येथे जात असताना हा अपघात झाला असावा. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊनही तो कुणाच्या निदर्शनास न आल्याने गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत खड्यातच पडून होता.
दरम्यान, मौजे जोला येथील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे व सौ. आशाताई ढाकणे हे बीडकडे जात असताना त्यांना खड्यात मोटारसायकल दिसली. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहणी केली असता जखमी तरुण दिसून आला. त्यांनी तातडीने खड्यात उतरून त्यास बाहेर काढले व १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करून एमआरआय तपासणी केली. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यास कुटुंबीयांनी अहमदनगर येथे हलविले आहे.
अपघातातील जखमींना मदत करा; माणुसकी जपा, जीव वाचवा!
सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांचे आवाहन
रस्ता अपघातांचे प्रमाण वाढत असताना अपघातग्रस्त जखमींना वेळेत मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपघात झाल्यानंतर काही मिनिटांत योग्य मदत मिळाल्यास जखमींचा जीव वाचू शकतो. त्यामुळे नागरिकांनी अपघातस्थळी थांबून मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन महा एनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य चे बीड जिल्हा समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी केले.
अपघातस्थळी गर्दी करून वेळ वाया घालविण्यापेक्षा जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचविणे, 108/112 वर संपर्क साधून ॲम्ब्युलन्स बोलावणे, प्राथमिक उपचार करणे आणि जखमींना धीर देणे ही खरी समाजसेवा असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.
“अपघात पाहून घाबरू नका. ‘मला काही अडचण येईल’ या भीतीमुळे मदतीपासून दूर राहू नका. प्रत्येकाने माणुसकीच्या नात्याने पुढे येऊन जखमींचे प्राण वाचवावेत,” असेही बाजीराव ढाकणे यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी नागरिकांना अपघात झाल्यास त्वरित मदत करण्याचे आवाहन करताना, मदतीला धावून जाणे, संबंधित यंत्रणेला माहिती देणे आणि जखमींना सुरक्षित उपचार मिळवून देणे, यावर भर दिला.
“आज केलेली मदत उद्या कोणाच्यातरी आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. चला, माणुसकी जपूया… जीव वाचवूया!” असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी केले.
Comments
Post a Comment