मनरेगा अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतील गैरव्यवहाराच्या विरोधात ऑल इंडिया पॅंथर सेनेचा आंदोलनाचा इशारा
मनरेगा अंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतील गैरव्यवहाराच्या विरोधात ऑल इंडिया पॅंथर सेनेचा आंदोलनाचा इशारा
नितीन सोनवणे व कार्यकर्ते २० जानेवारी रोजी बिंदुसरा धरणात जलसमाधी घेणार
बीड, दि. १३ जानेवारी २०२६ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत (मनरेगा) राबविण्यात आलेल्या मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेतील तांदळवाडी घाट ता. जि. बीड येथील खडीकरण रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात ओव्हरलॅपिंग, बोगस कामे व गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करीत ऑल इंडिया पॅंथर सेनाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकरणी ऑल इंडिया पॅंथर सेना महाराष्ट्र प्रवक्ता तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी मा. जिल्हाधिकारी, बीड, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड तसेच मा. गट विकास अधिकारी, पंचायत समिती बीड यांना लेखी स्वरूपात तक्रार देण्यात आली होती. मात्र, आजतागायत या तक्रारीकडे कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या नितीन सोनवणे व असंख्य कार्यकर्त्यांनी दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी मोजे पाली येथील बिंदुसरा धरण या ठिकाणी जलसमाधी घेण्याचा ठाम निर्णय जाहीर केला आहे.नितीन सोनवणे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबविलेल्या या महत्त्वाच्या योजनेतून शेतापर्यंत पोहोचणाऱ्या पाणंद रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार करून गरीब कामगारांचे पैसे खाल्ले गेले. शासनाच्या यंत्रणांनी त्वरित कारवाई न केल्यास आम्ही आमच्या प्राणांची बाजी लावण्यास तयार आहोत. ही केवळ धमकी नसून, अन्यायाविरुद्धचा लढा आहे.”या आंदोलनामुळे बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकास कामांमधील पारदर्शकता व जबाबदारीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून याबाबत लवकरात लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Comments
Post a Comment