अखेर चिमुकल्यांच्या आक्रोशाने जिल्हा प्रशासन जागे

अखेर चिमुकल्यांच्या आक्रोशाने जिल्हा प्रशासन जागे

सव्वा दोन महिन्यांपासून लिंबाच्या झाडाखाली शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ‘वनवास’ संपला

सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याला यश; प्रसारमाध्यमांचे आभार – डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि. ११)माजलगाव तालुक्यातील गेवराई मतदारसंघातील टाकरवण जिल्हा परिषद शाळा केंद्रांतर्गत येणाऱ्या दत्तनगर वस्तीशाळेच्या विद्यार्थ्यांना अखेर त्यांच्या हक्काची शाळा इमारत मिळाली आहे. शाळेसाठी सुसज्ज इमारत उपलब्ध असतानाही शाळेकडे जाणारा रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याने गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून विद्यार्थ्यांना लिंबाच्या झाडाखाली, उघड्यावर शिक्षण घ्यावे लागत होते.

या गंभीर प्रकरणी शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व पालकांनी वरिष्ठ कार्यालयांकडे वारंवार लेखी निवेदने सादर केली होती; मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नव्हती.

अखेर सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली सहकारी, शिक्षणप्रेमी, पालक व विद्यार्थ्यांनी दि. ०५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी “जिल्हाधिकारी जागे व्हा”, “पालकमंत्री अजित पवार जागे व्हा”, “आ. विजय सिंह पंडित जागे व्हा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

यानंतर विद्यार्थ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना तातडीने शाळेचा रस्ता खुला करण्याचे आदेश दिले.

प्रशासनाची तत्काळ कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दि. ०९ (शुक्रवार) रोजी गटविकास अधिकारी ज्योत्स्ना मुळीक, तलाठी राहुल भदे व ग्रामविकास अधिकारी प्रतापसिंह नाईक यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देत पंचनामा केला.
शाळेकडे जाण्यासाठी तीन मार्ग खुले करण्यात आले असून आता वर्ग पुन्हा शाळेच्या इमारतीत सुरू करण्यात आले आहेत.

यासंदर्भात गटविकास अधिकारी ज्योत्स्ना मुळीक यांनी सांगितले की,
“वरिष्ठांच्या आदेशानुसार रस्ता खुला करण्यात आला आहे. भविष्यात शाळेच्या मार्गात कोणीही अडथळा निर्माण केल्यास नियमानुसार संबंधितांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल.”


दत्तनगर वस्तीशाळेसाठी २००७–०८ मध्ये शाळा इमारत बांधण्यात आली होती; मात्र अतिक्रमणामुळे शाळेकडे जाणारा मार्ग बंद झाला होता. कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घ्यावे लागत असल्याने पालक व शिक्षणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.

अखेर सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून चिमुकल्यांचा ‘वनवास’ संपला आहे.
चिमुकल्यांचा आवाज शासनदरबारी बुलंद करणाऱ्या प्रसारमाध्यमांचे पालक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमींच्या वतीने डॉ. गणेश ढवळे यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी