पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा ऐतिहासिक , सांस्कृतिक वारसा नामशेष करण्याचा प्रयत्नांच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन

वाराणसीतील मणिकर्णिका घाटाची तोडफोड करून

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा ऐतिहासिक , सांस्कृतिक वारसा नामशेष करण्याचा प्रयत्नांच्या निषेधार्थ लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन

लिंबागणेश :- (दि.२७)
उत्तरप्रदेशातील वाराणसी येथील जगप्रसिद्ध मणिकर्णिका घाटावर सुरू असलेल्या पुनर्विकास कामाच्या नावाखाली ऐतिहासिक मूर्ती व शिवलिंगांची तोडफोड करण्यात आल्याचे प्रकार सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून समोर आले आहेत. संपूर्ण भारतात सांस्कृतिक पुनरुत्थानाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या ऐतिहासिक संरचनांचे झालेले नुकसान हा केवळ बांधकामाचा प्रश्न नसून तो धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशावर झालेला घाला असल्याचे मत व्यक्त होत आहे.
या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार (दि. २७) रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर–अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक, लिंबागणेश येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रविंद्र निर्मळ, कृष्णा पितळे यांची समयोचित भाषणे झाली.निवेदन मंडळ अधिकारी उज्ज्वला राऊत, तलाठी गणपत पोतदार, सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड,पोह.अविनाश घुंगरट,पोह. गणेश परजने यांनी स्विकारले. यावेळी आंदोलनात सरपंच बालासाहेब जाधव, राजेभाऊ आप्पा गिरे, सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, अँड . गणेश वाणी,दामोदर थोरात, समीर शेख, औदुंबर नाईकवाडे,अनंतकाका मुळे, गणपत घोलप, बाळकृष्ण थोरात, कृष्णा पितळे,अमोल पितळे,संदिप मुळे,शहादेव धलपे, रामचंद्र मुळे, रामचंद्र गिरे,हिरामण मुळे, विशाल तागड, ऋषिकेश तागड, गणेश तागड, दत्ता गिरे,बंकट लगास, सुनिल मुळे, हनुमान वैद्य, प्रकाश मुळे, सुखदेव वाणी, दादाराव येडे,बबन गोंडे,दशरथ दाभाडे, दत्ता मुळे, जयदेव गिरे, अशोक तागड,बंडु ढगारे, कल्याण मुळे, अमोल गिरे, सचिन गिरे,बबन गिरे, अर्जुन पितळे, चक्रधर गिरे, महादेव मुळे,सुदाम मुळे,राजेभाऊ गिरे,बाळु सोनावणे आदी सहभागी होते.

निवेदनाद्वारे ठाम मागण्या

या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी बीड व पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान भारत सरकार, राज्यपाल तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात —

संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी,

दोषी अधिकारी व संबंधित एजन्सींवर कठोर कारवाई करावी,

तोडफोडीत नुकसान झालेल्या मूर्ती ढिगाऱ्यातून तात्काळ बाहेर काढून अहिल्यादेवी होळकर चॅरिटीज ट्रस्टकडे सुपूर्द कराव्यात,

ट्रस्टच्या समन्वयाने मूर्तींची पुनर्स्थापना करण्यात यावी,
अशा ठाम मागण्या करण्यात आल्या.


शांततेत पण ठाम आंदोलन

या रास्ता रोको आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, भाविक नागरिक तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वारशाबाबत आस्था असलेले नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हे आंदोलन पूर्णतः शांततेच्या मार्गाने पार पडले.

ऐतिहासिक वारशावर घाला

सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या ऐतिहासिक घाटाचे स्मशानघाट विकास प्रकल्पांतर्गत नुकसान झाल्यानंतर काशीपासून इंदूरपर्यंतच नव्हे तर संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी काशीच्या ८४ घाटांपैकी मणिकर्णिका घाटाचे बांधकाम सन १७७१ मध्ये केले होते.

या घाटाशी संबंधित अनेक ऐतिहासिक मूर्ती व धार्मिक प्रतीके या तोडफोडीत खराब झाली असून काही मूर्ती ढिगाऱ्याखाली दबल्या, तर काही उघड्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. ज्या ठिकाणी ही तोडफोड झाली, तेथे अहिल्यादेवी होळकर यांच्या शिवआराधनेशी संबंधित प्रतिमा स्थापित होत्या.

मणिकर्णिका घाटाची देखभाल अहिल्यादेवी होळकर चॅरिटीज ट्रस्ट कडून केली जाते. ट्रस्टचे अध्यक्ष यशवंतराव होळकर यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या या कारवाईवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

दरम्यान, इंदूरच्या होळकर राजघराण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची व नुकसान झालेल्या मूर्तींची पुनर्स्थापना करण्याची मागणी केली आहे.

मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार केल्यास मोक्षप्राप्ती होते, अशी धार्मिक मान्यता असून यात्रेकरूंसाठी धर्मशाळा, मंदिरे, अन्नछत्रे व स्नानगृहे उभारून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी काशीच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घातली होती.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी