माजी सैनिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष; बीड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयावर माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांचे गंभीर आरोप
बीड (प्रतिनिधी) : माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेले बीड जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत असल्याचा गंभीर आरोप माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी केला आहे. कार्यालयाने शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना बगल देत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पिडीत माजी सैनिकांवर अन्याय केल्याचा दावा त्यांनी केला.
वाघमारे यांनी सांगितले की, माजी सैनिकांच्या तक्रारी सोडवण्याऐवजी त्यांचीच पडताळणी व अडवणूक केली जाते. अमृत जवान सन्मान योजना वेळेत राबवण्यातही दुर्लक्ष करण्यात आले असून, याबाबत तक्रारी करूनही कार्यवाही झालेली नाही. तसेच, असंवैधानिक समित्या स्थापन करून काही माजी सैनिकांना मोहरा बनवत अन्यायकारक कारवाया केल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांकडूनही आपल्यावर अन्याय होत असून, यासंदर्भात न्यायालय, मानवाधिकार आयोग व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी दाखल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी सैनिकांना न्याय न मिळाल्यास आंदोलन व कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा इशारा माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment