जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी प्रजासत्ताकदिनी विषप्राशनाची वेळ

जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी प्रजासत्ताकदिनी विषप्राशनाची वेळ शिक्षणप्रेमी अमोल जाधवांवर येणे हि शासन–प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब ; खाजगी संस्थानिकांशी संधान बांधून सरकारी शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र :- डॉ. गणेश ढवळे
बीड :- (दि. २६)
नांदुरघाट ता. केज जि. बीड येथील जिल्हा परिषद शाळेसाठी वर्गखोल्या मंजूर न झाल्याने तसेच शाळा बांधकामातील कथित गैरव्यवहारावर कारवाई व्हावी या मागण्यांसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल जाधव यांना प्रजासत्ताकदिनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करावा लागणे, ही घटना शासन व प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण असून अत्यंत लाजिरवाणी आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी व्यक्त केली आहे.

नांदुरघाट येथील जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी, ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना मूलभूत शैक्षणिक सुविधा मिळाव्यात तसेच शाळा बांधकामातील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी यासाठी अमोल जाधव गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने शासन व प्रशासन स्तरावर पाठपुरावा, आंदोलने तसेच न्यायालयीन प्रयत्न करत होते. मात्र, वारंवार निवेदने देऊनही शाळेसाठी आवश्यक वर्गखोल्या मंजूर न झाल्याने आणि प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने अखेर दि. २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताकदिनी त्यांनी विषप्राशन करून टोकाचे पाऊल उचलले.

जिल्हा प्रशासनातील काही अधिकारी खाजगी शिक्षणसंस्थाचालकांशी संगनमत करून जिल्हा परिषद शाळा डबघाईस आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, जिल्हा परिषद शाळा जगविण्यासाठी झटणाऱ्या शिक्षणप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने शासन व प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे डॉ. ढवळे यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच नांदुरघाट येथील जिल्हा परिषद शाळेसाठी त्वरित वर्गखोल्या मंजूर करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री, विभागीय आयुक्त यांच्याकडे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या मार्फत केली आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी