अपघातग्रस्त तरुणाला वेळेत मदत करणाऱ्या ढाकणे दाम्पत्याचा बीड शहर बचाव मंचाच्या वतीने प्राचार्य डी. जी. तांदळे सर यांच्या हस्ते सत्कार


       बीड (प्रतिनिधी) : - मौजे जोला (ता. केज) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई बाजीराव ढाकणे व सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नवनाथ ढाकणे यांनी अपघातग्रस्त तरुणाला वेळेत मदत करून माणुसकीचा आदर्श निर्माण केला. त्यांनी धिरज भवर (रा. हरीनारायण आष्टा, ता. आष्टी) या तरुणास १०८ रुग्णवाहिकेतून बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या उल्लेखनीय कार्याबद्दल मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डी. जी. तांदळे सर यांनी सौ आशाताई ढाकणे व बाजीराव ढाकणे दाम्पत्याचा सत्कार करून विशेष कौतुक केले.
केज–बीड रस्त्यावर अपघात झाल्यानंतर जखमी तरुणाला तातडीने उपचार मिळणे गरजेचे होते. अशा स्थितीत सौ. आशाताई ढाकणे व बाजीराव ढाकणे यांनी क्षणाचाही विलंब न करता १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. जखमी तरुणास त्वरित रुग्णवाहिकेतून बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याच्यावर तातडीचे उपचार सुरू होऊ शकले. वेळेत मदत मिळाल्याने पुढील उपचाराची प्रक्रिया सुलभ झाली, असेही सांगण्यात आले.
या प्रसंगी प्राचार्य डी. जी. तांदळे सर यांनी ढाकणे दाम्पत्याच्या कार्याचे कौतुक करताना, “अपघात किंवा संकटाच्या वेळी मदतीला धावून जाणे हीच खरी समाजसेवा आहे. अशा माणुसकीच्या कृतीमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो,” असे गौरवोद्गार काढले. तसेच नागरिकांनी अपघातस्थळी फक्त गर्दी न करता जखमींना तातडीने मदत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
ढाकणे दाम्पत्यानेही “गरजूला मदत करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. अपघातस्थळी मदतीला धावून गेल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात,” अशी भावना व्यक्त केली. या सत्कारामुळे प्रेरणा मिळाली असून नागरिकांनी भविष्यातही कोठेही अपघात झालेला असल्यास क्षणाचाही विलंब न करता अपघातग्रस्तांना मदत केली पाहिजे असे बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे. तसेच आपण करत असलेलं सामाजिक कार्य म्हणजे संकटात सापडलेल्या माणसाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणे हेच असते ते काम निरंतर चालू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    यावेळी काँग्रेसचे बीड शहराध्यक्ष तथा उद्योजक परवेझ कुरेशी, नगरसेवक झक्कीउदिन मोमिन, किसान सभेचे सरचिटणीस ज्योतीराम हुरकुडे, सामाजिक कार्यकर्त्या आम्रपाली साबळे, डॉ साक्षी जोगदंड, अॅड अनिल बारगजे, अॅड नितीन वाघमारे, बीड शहर बचाव मंचाचे नितीन जायभाये, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष फौजी अशोकराव येडे, साप्ताहिक संघर्षयात्रा चे संपादक आत्माराम वाव्हळ, पत्रकार संजय कुलकर्णी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस भाऊराव प्रभाळे, डोळस, इत्यादी मान्यवर मंडळींची उपस्थिती होती.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी