अंजनवती गावात बिबट्याने बोकडाचा फडशा पाडला! ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट

अंजनवती गावात बिबट्याने बोकडाचा फडशा पाडला! ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट 

वनरक्षक महेश मेटे यांनी घटनास्थळी पंचनामा केला 
बीड प्रतिनिधी : (दि.१६)बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश पंचक्रोशीतील अंजनवती गावात काल मध्यरात्री बिबट्याने राजाभाऊ रामकिसन येडे यांच्या बोकडावर हल्ला करून त्याचा फडशा पाडल्याची घटना घडली. या घटनेनंतर दुपारी वनरक्षक महेश मेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला, तर चौसाळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी बहिरवाळ यांनी मृत बोकडाचे शवविच्छेदन केले.

या घटनेमुळे लिंबागणेश पंचक्रोशीमध्ये काही दिवसांपूर्वी मागे पडलेला बिबट्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

रेवण येडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री अंजनवती गावातील अर्जुन येडे यांनी शेतात बिबट्या दिसल्याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्याच सुमारास, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास राजाभाऊ रामकिसन येडे यांच्या गोठ्यातील बोकड गायब असल्याचे निदर्शनास आले. काही नागरिकांच्या मते बिबट्याने बोकड उचलून नेला असावा.

दुसऱ्या दिवशी दुपारी शोध घेतला असता गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील फड शेतात बोकड छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. याबाबत रेवण येडे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती दिल्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास वनरक्षक महेश मेटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी बहिरवाळ यांनी शवविच्छेदन केले.

या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी