सरकारी बाबूंना दंड, मात्र कंत्राटदारांना पायघड्या!
सरकारी बाबूंना दंड, मात्र कंत्राटदारांना पायघड्या!
वडवणी–तेलगाव २५५ कोटींच्या शक्तीपीठ महामार्गावर काम सुरू असतानाच तडे
कंत्राटदार व अभियंत्यावर कारवाईची मागणी : डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि. २०)केंद्र शासनाच्या रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत १९ जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १८० शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून एकूण १ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
एकीकडे जिल्हा प्रशासन व रस्ता सुरक्षा समिती नियम मोडणाऱ्या सरकारी बाबूंवर तत्परतेने दंडात्मक कारवाई करत असताना, दुसरीकडे मात्र कोट्यवधींचे रस्ते काम निकृष्ट दर्जाचे असतानाही संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी प्रशासनाच्या या दुजाभावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काम सुरू असतानाच रस्त्यावर तडे गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह
बीड–परळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ एफ (शक्तीपीठ महामार्ग) अंतर्गत जरूड–शिरसाळा या सुमारे ५५ किलोमीटर अंतरावरील अंदाजे २५५ कोटी रुपये खर्चाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मात्र, काम सुरू असतानाच रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडू लागल्याने या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काम पूर्ण होण्यापूर्वीच तडे पडणे म्हणजे निकृष्ट दर्जाचे साहित्य व चुकीच्या तांत्रिक प्रक्रियेचा स्पष्ट पुरावा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. असे असतानाही राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र भोपळे हे संबंधित कंत्राटदार एम. के. शिवहरे कन्स्ट्रक्शन यांची सातत्याने पाठराखण करत असल्याचा आरोप डॉ. ढवळे यांनी केला आहे.
सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची गुणनियंत्रक विभागामार्फत (Quality Control) तातडीने सखोल चौकशी करून,
कामाच्या दर्जात तडजोड करणाऱ्या कंत्राटदारावर
तसेच जबाबदारी टाळणाऱ्या संबंधित अभियंत्यावर
प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आल्याचे डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment