महाजनवाडी ते अयोध्याधाम पायी जाणाऱ्या रथयात्रेचे लिंबागणेश येथे भव्य स्वागत
बीड प्रतिनिधी :-श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र महाजनवाडी, ता. बीड येथून अयोध्याधामकडे निघालेल्या ७५ दिवसीय सुमारे २ हजार किलोमीटर अंतराच्या पायी “नमो श्रीराम नाम रथयात्रा” दिंडी सोहळ्याचे लिंबागणेश येथे जल्लोषात व भक्तिभावाने भव्य स्वागत करण्यात आले.
ही ऐतिहासिक व अध्यात्मिक रथयात्रा रविवार, दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ६ वाजता श्री हनुमान मंदिर, श्रीक्षेत्र महाजनवाडी येथून प्रारंभ झाली असून गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२५ रोजी श्रीक्षेत्र अयोध्याधाम येथे तिची सांगता होणार आहे.
ही यात्रा केवळ पायी चालण्यापुरती मर्यादित नसून, अखंड श्रीराम नामस्मरण, भक्ती, त्याग, सेवा, समाजजागृती व अध्यात्मिक संदेश देणारी प्रेरणादायी चळवळ आहे. पायी नामजप करीत ही रथयात्रा महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या तीन राज्यांमधून मार्गक्रमण करणार आहे. यात्रेदरम्यान विविध ठिकाणी रामकथा, हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
लिंबागणेश येथे रथयात्रेचे ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. श्रीराम नामाचा जयघोष करत भाविकांनी भक्तिभाव व्यक्त केला. यावेळी ह. भ. प. अनंत काका मुळे, पांडुरंग महाराज वाणी, सतीश शिंदे, प्रकाश वायभट, बाबू शिंदे, चेतन कानिटकर, प्रथमेश कुलकर्णी, वरद देवा जोशी, हरिओम क्षीरसागर व डॉ. गणेश ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अनंत काका मुळे यांच्या वतीने भाविकांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.
रथयात्रेच्या संपूर्ण मार्गावर श्रीराम भक्तांसाठी प्रसाद वाटप, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, सामाजिक सलोखा आणि अध्यात्मिक जागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या ७५ दिवसीय यात्रेत हजारो श्रीराम भक्त प्रत्यक्ष सहभाग घेणार असून लाखो भाविक या पवित्र यात्रेचे साक्षीदार होणार आहेत.
दिनांक २६ मार्च २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या दिवशी श्रीक्षेत्र अयोध्याधाम येथील लक्ष्मण घाटावर या रथयात्रेचा भव्य समारोप होणार असून, श्रीराम दर्शन, श्रीराम नाम संकीर्तन, संत-महंतांचे प्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक व रथयात्रेचे संकल्पक विष्णुदास महाराज सुरवसे यांनी दिली.
Comments
Post a Comment