पंचशील नगर येथे भीमगीतांचा कडकडाट; भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त संतोष जोंधळे यांचा कार्यक्रम संपन्न
पंचशील नगर येथे भीमगीतांचा कडकडाट; भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त संतोष जोंधळे यांचा कार्यक्रम संपन्न
नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम; भीमप्रेमींची अलोट गर्दी
बीड (प्रतिनिधी):भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या शौर्य गाथेला अभिवादन करण्यासाठी आणि शौर्य दिनाचे औचित्य साधून बीड शहरातील पंचशील नगर येथे भव्य 'भीमगीत' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांच्या सुमधुर आवाजाने पंचशील नगर परिसर भीममय झाला होता. नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद अण्णा शिंदे आणि रंजीत बनसोडे यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी उपस्थिती लावून अभिवादन केले. त्यांच्यासोबतच नगरसेवक विनोद मुळूक, नगरसेवक भैय्यासाहेब मोरे आणि आरतीताई बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी भीमा कोरेगावच्या इतिहासाला उजाळा देत उपस्थितांना शौर्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गायक संतोष जोंधळे यांनी सादर केलेल्या क्रांतीकारी भीमगीतांनी उपस्थितांमध्ये नवा उत्साह भरला. या कार्यक्रमाला केवळ पंचशील नगरच नव्हे, तर बीड शहरातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
नगरसेवक प्रमोद अण्णा शिंदे यांनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर अशा सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंजीत बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment