महामानव अभिवादन ग्रुप तर्फे प्रकाश आंबेडकर नगर येथे 43 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

वाचाल तर वाचाल तर्फे निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धाचे बक्षीस वितरण

 बीड (प्रतिनिधी) आपल्या देशात अनेक थोर महापुरुष व आदर्श महामाता होऊन गेल्या आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ व आद्य शिक्षिका सावित्रीमाई फुले,समाज सुधारक व शिक्षण तज्ञ शेख फातिमा व महाराणी अहिल्याबाई होळकर अशा अनेक थोर महामातांचे जयंती दिन सणासारखे संपन्न करून त्यांच्या जीवन कार्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करणे व नवीन पिढी पुढे त्यांचा आदर्श कसा राहील हे समजावून सांगणे गरजेचे आहे तरच राष्ट्र प्रेमाने प्रोत्साहित होऊन सुसंस्कारित पिढी घडेल असे प्रतिपादन समता सैनिक दलाच्या कंपनी कमांडर सुजाता वासनिक यांनी केले. "वाचाल तर वाचाल" फिरते मोफत वाचनालयाने महामानव अभिवादन ग्रुप संचलित प्रकाश आंबेडकर नगर येथील मोफत शिकवणी वर्गात राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धा व वकृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्ष म्हणून भारतीय सेनेच्या बॉम्बे इंजीनियरिंग रेजिमेंट मध्ये 30 वर्षे सेवा करून निवृत्त झालेले ऑनररी सुभेदार मेजर मोहन घाडगे तर प्रमुख पाहुणे म्हणून समता सैनिक दलाच्या कंपनी कमांडर सुजाता वासनिक व "प्रवक्ता लोकशाहीचा" चे संपादक नितीन मुजमुले लाभले होते. महामानव ग्रुपचे अध्यक्ष जी.एम भोले, समता सैनिक दलाचे मेजर जनरल कॅप्टन राजाभाऊ आठवले, एस. एस सोनवणे ॲड.तेजस वडमारे, डॉ. जगदीश वाघमारे यांची विचार मंचावर उपस्थिती होती. सर्वप्रथम राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प व पुष्प माला आणि दिपप्रज्वलित करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष डी.जी वानखेडे यांनी करून महामानव अभिवादन ग्रुप व वाचाल तर वाचाल राबवित असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. वाचनालयाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धा व वकृत्व स्पर्धेतील प्रथम आलेल्या व घटक चाचणीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व महापुरुषांची जीवन चरित्र पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वाचनालयातर्फे शालेय साहित्य तर महामानवा अभिवादन ग्रुप तर्फे 43 विद्यार्थ्यांना हासुरे इंग्लिश ग्रामर हे पुस्तक वाटप करण्यात आले.
महामानव अभिवादन ग्रुप व वाचनालयातर्फे नेहमी करिता मदतीचा हात पुढे राहील असे ठोस आश्वासन जी.एम भोले यांनी दिले. कार्यक्रम प्रसंगी नितीन मुजमुले यांनी देखील स्पर्धा परीक्षेचे महत्त्व, अभ्यासातील सातत्य व ग्रंथाच्या सहवासात राहून विद्यार्थ्यांनी कणा-कणांनी ज्ञान मिळविण्याचे व वाचनाचे महत्त्व अत्यंत सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तर अध्यक्षीय समारोपात आयु मोहन घाडगे यांनी जीवनातील शिस्तीचे, राष्ट्रप्रेमाचे व आई-वडील तसेच गुरुजनांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व समजावून सांगितले. महामानव अभिवादन ग्रुप राबवीत असलेल्या विविध उपक्रमाने ते भारावून गेले व त्यांनी महामानव अभिवादन ग्रुपच्या कार्याला 1000/ रुपये रोख आर्थिक दान देऊन आपल्या जन्म गावी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी वर्ग सुरू करण्याचे ठोश आश्वासन दिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षिका विशाखा वाघमारे यांनी व्यक्त केले कार्यक्रमास परिसरातील बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते. वाचनालयातर्फे अल्पोपहार वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी