चौसाळा येथील स्टेट बँकेच्या कारभाराला ग्राहक वैतागले

चौसाळा येथील स्टेट बँकेच्या कारभाराला ग्राहक वैतागले
शाखाधिकारी फनिकेश्वर कुंडाचा मनमानी कारभार थांबवा - विवेक कुचेकर
(चौसाळा प्रतिनिधी

बीड तालुक्यातील चौसाळा ही तालुक्यातील प्रमुख व्यापारी पेठ असून चौसाळा शहराला जवळपास परिसरातील ४० ते ५० गावच्या लोकांचा दैनंदिन व्यवहारासाठी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेशी संपर्क असतो. सदरील शाखेचा शाखा अधिकारी पदाचा पदभार फनिकेश्वर कुंडा यांनी घेतल्यापासून या शाखेचा कारभार पूर्णपणे ढेपाळला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी केला आहे. 

सदरील शाखेत कायम चलन तुटवडा असतो. (दि. १६) डिसेंबर मंगळवार रोजी चौसाळापासून जवळच असलेल्या रुईगव्हाण येथील आजारी असलेल्या शेतकरी महिला सोजर श्रीमंत जाधव आपल्या पती समवेत बँकेत आल्या होत्या. दवाखान्यात जाण्यासाठी फक्त चार हजार रुपयांची रक्कम काढण्यासाठी त्या तब्बल दोन तास कॅशियर च्या समोर आजारी असतानाही बसलेल्या होत्या. बँकेत कॅश उपलब्ध नसली तरी अनेक खातेदार ग्राहक बँकेत पैसे टाकण्यासाठी बसले होते. परंतु त्यांनी बँकेत भरण्यासाठी आणलेली रक्कम ही स्वीकारण्यात येत नव्हती. याबाबत काही ग्राहकांनी शाखेचे शाखा अधिकारी फनिकेश्वर कुंडा यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून ग्राहकांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात होती. शेवटी आजारी असलेल्या महिलेचे हाल बँकेत आलेल्या ग्राहकांना पहावेनेसे झाले होते. त्यामुळे बँकेत आलेले ग्राहक अरुण नाईकवाडे, संतोष तेलप यांच्यासह काही ग्राहकांनी शाखाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना असे सांगितले की, कॅश येईल तेंव्हा येईल. परंतु सध्या जे लोक बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी आलेले आहेत त्यांचे पैसे स्वीकारा आणि ज्यांची अडचण आहे त्यांना जेवढे उपलब्ध होतील किमान तेवढे तरी द्या. यावेळी शाखा अधिकारी फनिकेश्वर कुंडा यांनी असे उत्तर दिले की, कॅशियर जेवणासाठी गेलेले आहेत. शेवटी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी शाखाधिकारी यांना असे म्हटले की, किमान तुम्ही आजारी असलेल्या त्या महिलेला कॅबिन मधून बाहेर येऊन पहा आणि त्यांना तरी पैसे द्या त्यानंतर शाखाधिकारी यांनी कॅशियर यांना बोलावून बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांची रक्कम भरून घेतली आणि अडचणीत असलेल्या ग्राहकांना थोडी थोडी रक्कम देण्यास सुरुवात केली. 

फनिकेश्वर कुंडा यांनी शाखा अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यापासून सदरील बँक शाखेचा कारभार हा पूर्णपणे ढेपाळलेला असून येथील बँक ग्राहक खातेदार यांच्या कारभाराला पुरते वैतागले आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांनी केला आहे. खरिपाच्या पिकासाठी बँकेत जुलै ऑगस्ट महिन्यात पीक कर्जाची मागणी केलेल्या शेतकऱ्यांना नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात पिक कर्ज वाटप करण्यात आले. त्यासाठी ही शेतकऱ्यांना बँकेच्या दारात उपोषणाला बसावे लागले होते. उपोषणाला बसल्यानंतरच शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले. तसेच अनेक वेळा एटीएम सुविधाही बंदच असते. सदरील बँक शाखेत आलेल्या ग्राहकांना कायम अरेरावीची भाषा वापरण्यात येते. काही ना काही टोलवाटोलवीची उत्तरे देऊन आलेल्या ग्राहकाचे बँके संबंधित काम रखडवले जाते. त्यामुळे आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन शाखा अधिकारी फनिकेश्वर कुंडा यांच्यावर योग्य ती कार्यवाही करून त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी परिसरातील बँक ग्राहक खातेदारांमधून करण्यात येत असुन सदरील बँकेच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास शाखा अधिकारी कुंडाच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विवेक कुचेकर यांच्यासह ग्राहकांनी दिला आहे 



माझे दुखत असून दवाखान्यात जाण्यासाठी चार हजार काढायचे आहेत. मी जवळजवळ दोन तासापासून इथं बसलेली आहे. साहेब म्हणतेत बँकेत पैसे नाहीत पैसे येणार आहेत आल्यावर देतोत.
---- सोजर श्रीमंत जाधव (महिला रुईगव्हाण)



मी पन्नास हजार रुपये काढण्यासाठी बँकेत चेक घेऊन आलो होतो. सुरुवातीला असे सांगितले की, नेट बंद आहे. दोन तास थांबलो त्यानंतर आम्हाला कॅश नसल्याचे सांगितले. शेवटी बँक बंद होईपर्यंत वाट पाहिली परंतु पैसे मिळाले नाहीत. मला पुणे येथे संध्याकाळी जायचे होते परंतु पैसे न मिळाल्याने माझे पुणे येथे जाणे रद्द झाले आहे. 
---- अरुण नाईकवाडे (नागरिक, चौसाळा)

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी