लिंबागणेश येथे शेतकरी पुत्रांचा एल्गार; भाववाढीसाठी ‘शेतकरी हक्क मोर्चा’त सहभागी होण्याचे आवाहन
लिंबागणेश येथे शेतकरी पुत्रांचा एल्गार; भाववाढीसाठी ‘शेतकरी हक्क मोर्चा’त सहभागी होण्याचे आवाहन – डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश : (दि.१८)
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज( दि.१८ ) गुरूवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या “शेतकरी हक्क मोर्चा”च्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुत्रांची बैठक संपन्न झाली. कापूस, सोयाबीन, तूर आदी शेतमालाला वाढीव दर मिळावा, सीसीआय व जिनिंग केंद्रांवरील शेतकऱ्यांची अडवणूक थांबवावी, हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच कापूस व सोयाबीनची परदेशातून होणारी आयात तत्काळ बंद करावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
दि.२५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या भव्य “शेतकरी हक्क मोर्चा”मध्ये शेतकरी, शेतकरी पुत्र, शेतकरी मित्र तसेच शेतकऱ्यांप्रति संवेदनशील सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीत शेतकरी हक्क मोर्चाचे नेते राजेंद्र आमटे, माजी सैनिक अशोक येडे, बाळासाहेब मोरे पाटील,कुलदीप करपे, सुहास जायभाये, रविंद्र निर्मळ यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडली. कार्यक्रमास राजेभाऊ गिरे, रविंद्र निर्मळ, शंकर वाणी , अशोक जाधव,दामोदर थोरात,बाळकृष्ण थोरात, चिंतामण ढास,औदुंबर नाईकवाडे,सुरज कदम, संजय पावले, पिनु वाणी,राजेंद्र वायभट, दत्ता झोडगे, शिवाजी घरत, तुळशीराम वनवे, मनोहर वाणी, विठ्ठल कदम, सय्यद सलीम,सुनिल भोसले, पत्रकार हरिओम क्षीरसागर
यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. गणेश ढवळे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी होत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. राज्य सरकारने कापसाला १२ हजार, सोयाबीनला ७ हजार व तुरीला १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर करावा. वाढती महागाई, बियाणे, खत, औषधे व मजुरीचे वाढलेले दर पाहता शेतमालाला योग्य भाव न मिळणे म्हणजे सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
Comments
Post a Comment