बीडमध्ये इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे १५ नगरसेवक विजयी
बीडमध्ये इतिहासात पहिल्यांदाच भाजपचे १५ नगरसेवक विजयी
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.ज्योती घुंबरे यांचा निसटता पराभव
बीड (प्रतिनिधी)
दि.२१ : बीड नगरपरिषद निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश संपादन करत शहराच्या राजकारणात आपली ताकद दाखवून दिली आहे. बीड नगरपरिषदेच्या एकूण ५२ जागांपैकी भाजपचे तब्बल १५ नगरसेवक विजयी झाले असून, बीडच्या इतिहासात प्रथमच भाजपने एवढ्या मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणण्याची कामगिरी केली आहे. यापूर्वी भाजपचा केवळ एक नगरसेवक असायचा. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.ज्योती घुंबरे यांचा मात्र निसटता पराभव झाला.
नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार डॉ.ज्योती घुंबरे यांनी अत्यंत चुरशीची व अटीतटीची लढत दिली. मात्र, शेवटच्या टप्प्यात अतिशय कमी मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला. या निवडणुकीत डॉ.घुंबरे यांना ३२ हजार ३३ मते मिळाली असून, हा वाढता जनाधार भाजपसाठी भविष्यात निश्चितच बळ देणारा आहे, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले. बीड नगरपरिषदेची निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या, मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर डॉ.क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणुकीची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांना खंबीर साथ देत जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्यासह सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीत परिश्रम घेतले.
भाजपच्या विजयी नगरसेवकांची नावे
प्रभाग क्र.२ मधून शुभम दिलीप धूत, सावित्री नितीन साखरे, ४ मधून मीनाताई जाधव, ५ मधून मीना रणजितसिंह चव्हाण, ७ मधून भाग्यश्री देशपांडे, जगदीश गुरखदे, ८ मधून राहुल गुरखुदे, १० मधून मंगेश धोंगडे, भाग्यश्री तांबारे, १२ मधून पूजा राजाभाऊ गुजर, १३ मधून समीक्षा शेटे, सय्यद मुस्तफा, १५ मधून डॉ.सारिका क्षीरसागर, आदित्य माने, २५ मधून ज्योती नंदकिशोर पिंगळे अशी भाजपच्या विजयी नगरसेवकांची नावे आहेत.
भाजपचा पहिला मुस्लिम नगरसेवक सय्यद मुस्तफा; शुभम धूत सर्वाधिक मतांनी विजयी
स्व.गोपीनाथराव मुंडे यांना मानणारे आणि भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार मुस्तफा सय्यद यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांच्या रूपाने बीडमध्ये भाजपचा पहिला मुस्लिम नगरसेवक झाला. तसेच, शुभम धूत हे सर्वाधिक १५८४ मतांनी विजयी झाले आहेत.
प्रचंड विरोधानंतरही डॉ.सारिकाताई क्षीरसागर विजयी
बीडमधील प्रभाग क्र.१५ च्या उमेदवार डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांना विरोधकांनी प्रचंड विरोध केला. अक्षरशः विरोधक याच प्रभागामध्ये तळ ठोकून होते. तरीही डॉ.सारिकाताई ह्या ७९६ मतांनी विजयी झाल्या. त्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी क्षीरसागर निवासस्थानी गुलाल उधळून जल्लोष केला.
माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही-डॉ.योगेश क्षीरसागर
बीडकरांनी निवडून दिलेल्या भाजपच्या विजयी १५ नगरसेवकांचे अभिनंदन करतो. आगामी काळात पक्षाचे संघटन वाढवून पुन्हा जनतेत जाऊ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजाताई मुंडे यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, पक्ष वाढीसाठी परिश्रम घेईल, असा शब्द डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिला.
Comments
Post a Comment