भीमपुत्र म्हणा! सूर्यपुत्र नव्हे...! ही विनंती...!
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विज्ञानवादी होते, त्यांनी अंधश्रद्धा मोडीत काढल्या, वाईट परपरांना नाकारले, पुराण कथा ठोकरीने उडवल्या, ब्राह्मणांच्या धर्मग्रंथांना डायनामाइट लावले, रामायण आणि महाभारताची चिरफाड केली. ग्रहताऱ्यांना न मानता त्यांनी करोडो लोकांचा उद्धार केला. परंतु त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर लेखक, कवी,शाहीर यांच्याकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वेगवेगळ्या उपमा दिल्या जाऊ लागल्या. उदाहरणार्थ...प्रज्ञासूर्य, ज्ञानसूर्य, ज्ञानाचा अथांगसागर इत्यादी...
2) नंतरच्या पिढीतील लेखक, कवी, शाहीर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत आंबेडकर, ज्यांना प्रेमाने सर्वजण भैय्यासाहेब म्हणत असत, त्यांना सूर्यपुत्र म्हणायला लागले. सूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना म्हटले गेले, त्या अर्थाने सूर्यपुत्र.
3) डॉ बाबासाहेब आंबेडकरांना फक्त सूर्य म्हणत नाहीत, तर 'प्रज्ञासूर्य' म्हणतात, त्या अर्थाने भैय्यासाहेबांना प्रज्ञासूर्यपुत्र म्हणायला पाहिजे होते, परंतु फक्त सूर्यपुत्रच म्हटले गेले. ज्यांनी ही परंपरा सुरू केली त्यांना भैय्यासाहेबांबद्दल आदरच होता यात काही शंका नाही, परंतु प्रत्येक परंपरा चांगलीच असते असे काही नाही. शब्दांचे अनेक अर्थ निघतात. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची स्वतःची शब्दावली आहे, चळवळीचे शब्द वेगळे असतात. जसे आपण चळवळीच्या कार्यक्रमाच्या स्टेजला 'विचारमंच' म्हणतो, याच स्टेजला परंपरेने व्यासपीठ म्हणतात, आपण व्यासपीठ शब्द नाकारला.
4) सूर्य, चंद्र,शनि,मंगळ हे ग्रह तारे आहेत. काहींनी यांना अज्ञानापोटी किंवा जाणून बुजून देव/दानव करून टाकले, किंवा तशा पुराण कथा लिहिल्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर विज्ञानवादी होते, त्यांना किंवा त्यांच्या वारसांना अशा प्रकारच्या उपमा देणे आंबेडकरी चळवळीच्या शब्दकोशात बसत नाही.
5) महाभारतामध्ये कर्ण नावाचे पात्र आहे. ज्याला सूर्यपुत्र म्हटले गेले आहे. कुंतीला लग्नाच्या अगोदर जो मुलगा होतो, तो कर्ण आहे. ज्याचे वडील सूर्य आहेत, असे महाभारत म्हणते. सूर्य, चंद्र ही काही माणसे नाहीत, त्यामुळे त्यांना मुलं होणे शक्य नाही. याचाच वैज्ञानिक अर्थ असा होतो की 'अनैतिक संबंधातून झालेल्या मुलाला महाभारतात सूर्यपुत्र म्हटले आहे.
6)डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव 'यशवंत' आंबेडकर आहे, ज्यांना लोक प्रेमाने भैय्यासाहेब म्हणत. राष्ट्रपिता जोतिबा फुले यांनी त्यांच्या मुलाचे नाव यशवंत ठेवले होते, राजर्षी शाहू महाराजांचे नाव यशवंत आहे. याच कारणामुळे बाबासाहेबांनी आपल्या मुलाचे नाव यशवंत ठेवले. माता रमाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाच अपत्य झाली, त्यातील फक्त यशवंत जगले, बाकी चार अपत्य बालपणीच दगावली.
7) भैय्यासाहेबांना 'सूर्यपुत्र' म्हटल्याने भैय्यासाहेबांचा अपमान होतो असे माझे मत आहे. स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर हे विज्ञानवादी होते, ग्रहताऱ्यावर त्यांचा कधीही विश्वास नव्हता. विज्ञानानुसार सूर्याला पुत्र होणे शक्य नाही, सूर्यपुत्र हा अवैज्ञानिक शब्द आहे, आंबेडकरी चळवळीत अशा शब्दाचा उपयोग करू नये. त्यामुळे सर्व आंबेडकरी समाजातील कार्यकर्त्यांना विनंती आहे की, भैय्यासाहेबांना सूर्यपुत्र न म्हणता, 'भिमपुत्र' म्हणावे.
8) काही लोक म्हणतील की, ही परंपरा आहे. आपण आंबेडकर चळवळीचे लोक आहोत, अपडेट आणि अपग्रेड झाले पाहिजे. परंपरा चुकीची असेल तर ती नाकारली पाहिजे. ज्यांनी भैय्यासाहेबांना सूर्यपुत्र म्हटले, ते त्यांनी आदरानेच म्हटलेले आहे, परंतु चळवळीतील लोकांनी शब्द जपून वापरले पाहिजेत.
9) कोलंबिया विद्यापीठाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना LLD पदवी दिली होती, Doctor of law and letters, अर्थात बाबासाहेब आंबेडकर शब्दाचे डॉक्टर आहेत, त्यामुळेच ते भारतीय संविधान लिहू शकले. सटीक शब्द वापरणे, योग्य शब्द निवडणे, यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जगामधील प्रमुख तज्ञापैकी एक आहेत. त्यांचे अनुयायी या नात्याने, आपण सुद्धा योग्य शब्दांचा उपयोग केला पाहिजे.
10) डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 'ज्ञानाचा अथांगसागर' सुद्धा म्हणतात, मग एखादा कवी, लेखक, शाहीर त्यांना 'सागरपुत्र' ही उपमा देऊ शकतो. परंतु अशा उपमा देणे योग्य नव्हे एवढेच मला येथे म्हणायचे आहे. आंबेडकरी शब्दकोश निवडूया, त्याच शब्दांचा उपयोग आपण करू.
भैय्यासाहेब उर्फ यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन व आंबेडकरी जनतेला हार्दिक शुभेच्छा
जय भीम
सिद्धार्थ शिनगारे
संचालक : डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टु पॉलिटिक्स, बीड
Comments
Post a Comment