लिंबागणेश गावात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

लिंबागणेश गावात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वनविभागाच्या अधिकाऱ्यांची ग्रामस्थांसोबत बैठक

पिंजरे लावून तातडीने बंदोबस्ताची मागणी – डॉ. गणेश ढवळे
लिंबागणेश (दि. १३) :
बीड तालुक्यातील लिंबागणेश गावाच्या पोखरवाडा शिवारात काल रात्री बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने तातडीने दखल घेतली आहे.

पिंपरनई, पोखरी, बेलगाव, फुकेवाडी ही गावे वनविभागाच्या अधिपत्याखाली येत असून परिसरात घनदाट जंगल असल्यामुळे बिबट्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी बिबट्या व त्याची पिल्ले परिसरात दिसल्याची माहिती वनविभागाला दिली होती. मात्र, त्यावेळी अधिकृत नोंद नसल्याचे सांगण्यात आले होते.

दि. १२ (शुक्रवार) रोजी रात्री पोखरवाडा शिवारात बिबट्या स्पष्टपणे दिसून आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज दि. १३ (शनिवार) रोजी सकाळी वनविभागाचे अधिकारी महेश मते यांनी लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. गणेश ढवळे यांनी केले.

यावेळी लिंबागणेशचे सरपंच बालासाहेब जाधव, पोखरी (घाट) चे सरपंच बिभीषण मुळीक, पिंपरनईचे सरपंच बाळासाहेब वायभट, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामोदर थोरात, सुरेश निर्मळ, मोहन कोटुळे, पांडुरंग वाणी, भगवान मोरे, रवी वायभट, कृष्णा वायभट, सुदाम मुळे, रमेश वाणी, संजय पावले, सुखदेव वाणी, विनायक वाणी, राजेंद्र कदम यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.




पिंजरे लावून तात्काळ बंदोबस्त करा; रात्रीची गस्त वाढवा – डॉ. गणेश ढवळे

बिबट्याचा वावर वाढल्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक झाले आहे. महिला, लहान मुले व वृद्ध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून अनेक पालकांनी मुलांना घराबाहेर जाण्यास मज्जाव केला आहे.
या पार्श्वभूमीवर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ पिंजरे लावावेत, ड्रोनद्वारे शोधमोहीम राबवावी तसेच रात्रीच्या वेळी वनविभागाची गस्त वाढवावी, अशी ठोस मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी वनसंरक्षक अशोक केदार व अधिकारी महेश मते यांच्याकडे केली.




बिबट्या संरक्षणाबाबत वनविभागाच्या सूचना – अशोक केदार

वनसंरक्षक अशोक केदार व महेश मते यांनी ग्रामस्थांना पुढील सूचना केल्या :

बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे

घराभोवती झुडुपे व गवत वाढू देऊ नये

जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत

रात्री पुरेसा प्रकाश ठेवावा

लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये

रात्री शेकोटी पेटवणे, मोठ्या आवाजात गाणी लावणे उपयुक्त ठरते





अफवा पसरवू नका; दक्षता घ्या – आप्पासाहेब रोकडे

नेकनूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे यांनी ग्रामस्थांना अफवा पसरवू नये, वनविभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे व जनजागृतीद्वारे स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन केले. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल राठोड, हवालदार गणेश परझने, मन्सूर शेख आदी उपस्थित होते.



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी