लिंबागणेश परिसरात कृषी पंपांचा दिवसा वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी ठरत आहे डोकेदुखी; पूर्ववत करण्याची मागणी. - हरिओम क्षीरसागर
बीड | प्रतिनिधी
लिंबागणेश परिसरात बिबट्याचा वावर आढळल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत कृषी पंपांसाठी दिवसा वीजपुरवठा सुरू केला. या निर्णयाबद्दल ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते.
मात्र, सध्या सुरू असलेला हा दिवसा वीजपुरवठा शेतकरी व ग्रामस्थांसाठी नव्या अडचणी निर्माण करत असल्याचे चित्र समोर येत आहे. घरगुती वीज वापर, पाणीपुरवठा योजना, शेतीची कामे तसेच दैनंदिन वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. परिणामी, अनेक ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पाणीपुरवठ्याचे नियोजन, घरगुती वापरासाठी आवश्यक असलेली वीज तसेच शेतकामांची वेळ यामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला असून, याचा थेट परिणाम ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेला कृषी पंपांचा दिवसा वीजपुरवठा पुर्ववत म्हणजेच पूर्वीप्रमाणे रात्री सुरू करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
या संदर्भात लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष हरिओम क्षीरसागर यांनी लिंबागणेश महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता गायकवाड यांच्या मार्फत, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच निवेदन सादर करून ग्रामस्थांच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या. संबंधित प्रशासनाने याबाबत तातडीने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment