दिव्यांगांच्या हक्कासाठी लढणारा निर्भीड आवाज- पत्रकार अण्णासाहेब साबळे जिजाऊ माँसाहेब आदर्श दिव्यांग पत्रकार पुरस्कार २०२६ साठी घोषित
आष्टी (प्रतिनिधी--गोरख मोरे ) :
दिव्यांग बांधवांच्या न्याय, हक्क आणि सन्मानासाठी गेली अनेक वर्षे अविरत लढा देणारे, माळी गल्ली, आष्टी (जि. बीड) येथील प्रखर सामाजिक बांधिलकी असलेले पत्रकार अण्णासाहेब दिनकर साबळे यांची प्रतिष्ठेच्या ‘जिजाऊ माँसाहेब आदर्श दिव्यांग पत्रकार पुरस्कार 2026’ साठी निवड करण्यात आल्याची घोषणा मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिरजे पत्रकार परिषद, आष्टी तर्फे करण्यात आली.
या निवडीची माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम पोकळे यांनी दिली .
तानुबाई बिरजे पत्रकार परिषदेतर्फे यावर्षी प्रथमच राज्यस्तरावर विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय व लोकहितवादी कार्य करणाऱ्या मान्यवरांना जिजाऊ माँसाहेब आदर्श राज्यस्तरीय पुरस्कार’ देण्यात येणार आहेत. त्यामध्ये दिव्यांग कल्याण व सामाजिक पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल अण्णासाहेब साबळे यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे .
दिव्यांग सुविधा केंद्रातील त्रुटी, मेडिकल प्रमाणपत्रासाठी होणारी हालअपेष्टा, बसस्थानकांवरील गैरवर्तन, प्रवासातील अडथळे, शिक्षणातील समस्या, तसेच शासन योजनांमधील कमतरता— या प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी धडाडीने आवाज उठवला.
त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक प्रकरणांमध्ये प्रशासनाला तातडीची कार्यवाही करावी लागली .उपेक्षितांच्या वेदनांना आवाज देणारी त्यांची निर्भीड लेखनशैली आजही जिल्ह्यातील माध्यमांसाठी आदर्श ठरते .
निवड समितीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे —
अण्णासाहेब साबळे यांचे दिव्यांग कल्याण क्षेत्रातील कार्य हे केवळ पत्रकारिता नसून सामाजिक न्यायासाठीचा एक अखंड लढा आहे. त्यांची निर्भीडता, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक कर्तव्यनिष्ठा यामुळेच त्यांची निवड निश्चित झाली .
एक शांत, मनमिळावू पण संकटाच्या क्षणी तितकाच ठाम व आक्रमक पत्रकार म्हणून त्यांनी जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे .
भीती, दबाव किंवा राजकीय हस्तक्षेपाला न जुमानता दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढणे— ही त्यांची कार्यशैली नव्या पिढीतील पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे .
या पुरस्कारामुळे आष्टी तालुक्यातील दिव्यांग कल्याण क्षेत्राला एक नवीन दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
सामाजिक संस्था, पत्रकार संघटना, मान्यवर, ग्रामस्थ आणि दिव्यांग बांधवांनी अण्णासाहेब साबळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे .
हा पुरस्कार लवकरच भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीने दिली आहे.
Comments
Post a Comment