गिनीज बुकात नोंद झालेली बीडची वृक्ष लागवड कागदोपत्रीच?
गिनीज बुकात नोंद झालेली बीडची वृक्ष लागवड कागदोपत्रीच?
लिंबागणेश ग्रामपंचायतीत आलेली झाडे पडूनच, तर लावलेली झाडेही जळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी.
(लिंबागणेश प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यात वनक्षेत्र वाढवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या हरित बीड अभियानाला मोठा गाजावाजा करण्यात आला. पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खंडेश्वरी परिसरात वृक्षारोपण करून जिल्हाभरात एकाच दिवशी तब्बल ३० लाख वृक्ष लागवड केल्याचा दावा करण्यात आला आणि या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची घोषणा करण्यात आली. मात्र या मोहिमेचे वास्तव गाव पातळीवर पूर्णपणे वेगळे चित्र उभे करत आहे.
लिंबागणेश ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा प्रशासनाकडून ५०० ते १००० रोपे पाठविण्यात आली होती. या रोपांपैकी काहींची लागवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात मोठ्या संख्येने झाडे ग्रामपंचायत कार्यालयासमोरच पडून आहेत. दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याने त्यापैकी काही रोपे जळूनही गेल्याचे निदर्शनास आले आहे.
वनवाढ आणि पर्यावरण संवर्धनासारख्या संवेदनशील उपक्रमात असा निष्काळजीपणा झाल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे. ग्रामपंचायतीच्या या अनागोंदी कारभारावर नागरिकांनी “आंधळदळतं कुत्रं पीठ खातं” अशा तीक्ष्ण प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की जिल्हा प्रशासन वनविस्ताराबाबत मोठमोठे दावे करत असताना प्रत्यक्षात गाव पातळीवर वृक्षलागवड हा उपक्रम केवळ कागदोपत्रीच राबवला जात आहे.
लावलेली झाडे जिवंत आहेत का? त्यांची नियमित पाणीपुरवठा आणि देखरेख केली जाते का? झाडांची नोंद आणि प्रत्यक्ष लागवड यामध्ये तफावत किती? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळावीत म्हणून जिल्हाधिकारी यांनी स्वतः येऊन पाहणी करावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पर्यावरण संरक्षणाचा मोठ्या थाटामाटात केलेला शासकीय उपक्रम वास्तविक पातळीवर कोसळताना दिसत असल्याने साध्या जनतेत भ्रमनिरास होत आहे. प्रशासनाकडून तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशीही जोरदार मागणी पुढे येत आहे.
Comments
Post a Comment