गोव्यात राज्यस्तरीय पश्चिम भारत विज्ञान मेळाव्याचे उत्साहात प्रारंभ
पणजी, २६ नोव्हेंबर २०२५:डीएम पीव्हीएस एस.एम. कुशे उच्च माध्यमिक शाळा आणि व्यावसायिक अभ्यास संस्था, पीव्हीएस कुशे नगर, आसगाव-बार्देश यांच्या वतीने राज्यस्तरीय पश्चिम भारत विज्ञान मेळा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले. तीन दिवस चालणाऱ्या या मेळ्यात राज्यभरातील ४० हून अधिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांचा सहभाग असून १५ शिक्षक समित्यांनीही आपली उपस्थिती नोंदवली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी संशोधन, प्रयोगशीलता आणि सर्जनशील विचारांवर अधिक भर देण्याची गरज व्यक्त केली. “अशा विज्ञान मेळ्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता वाढते. प्रयोग करण्यास घाबरू नये. विज्ञानाशिवाय आज पर्याय नाही. विचारशक्ती विकसित झाली तर संशोधनाची दिशा अधिक मजबूत होते,”असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, स्व. मनोहर पर्रिकर यंग सायंटिस्ट अवॉर्ड हा गोव्यासाठी अभिमानाचा विषय आहे. गोव्याच्या विद्यार्थ्यांनी या पुरस्काराकडे लक्ष्य ठेवून अधिक प्रगती साधावी.”
राज्यातील चालू संशोधन प्रकल्पांचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की धारगळ येथे आयुर्वेद संशोधन, ओल्ड गोव्यातील रिसर्च सेंटर, तसेच कुंडई येथील बायो-मेडिकल प्लांट यांसारख्या सुविधा विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण करत आहेत. त्यांनी हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन आणि फूड टेक्नॉलॉजी या विषयांवरही विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
“विकसित भारत २०४७ आणि विकसित गोवा २०३७ या उद्दिष्टांच्या दिशेने जाताना योग्य शिक्षणाची निवड आणि शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
विज्ञान मेळा पुढील दोन दिवस विविध मॉडेल्स, प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांनी सजणार आहे.
उद्घाटनप्रसंगी माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, ज्ञानप्रसारक मंडळाचे चेअरमन किरण शिरोडकर, पद्मश्री डॉ. शरद काळे, आणि SCERTच्या संचालिका मेघना शेतगावकर उपस्थित होते.
Comments
Post a Comment