डोंगराळे गावातील बालकावरील अत्याचाराच्या घटनेचा गेवराई येथे महिला दक्षता समितीच्या वतीने तीव्र निषेध

गेवराई ( प्रतिनिधी) दि. 22 - नाशिकजिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या निरागस चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत क्रूर व अमानुषपणे हत्या करण्यात आलेली घटना समोर आली आहे. या घटनेमुळे केवळ मालेगाव परिसरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून सर्वसामान्य नागरिकांत प्रचंड संताप व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणी गेवराई येथे महिला दक्षता समितीच्या वतीने आज 22 नोव्हेंबर 2025 रोजी गेवराई पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
         या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असली, तरी अशा विकृत आणि निर्घृण कृत्याविरोधात कठोरातील कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून समाजात अशा गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल आणि मुली-मुलांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी राज्यकर्त्यांची व यंत्रणेची ठाम इच्छा दिसून येईल. या पार्श्वभूमीवर यावेळी माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना तहसीलदार यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनामध्ये खालील मागण्या करण्यात आले आहेत.
 1) या प्रकरणातील आरोपपत्र तातडीने दाखल करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा आणि आरोपीस कमाल म्हणजे फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकारने प्रभावी आणि काटेकोर पद्धतीने बाजू मांडावी. 
2) घटनेचा तपास उच्चस्तरीय पातळीवर, निष्पक्ष व वेगाने पूर्ण करून सर्व पुरावे भक्कम करण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करावे. 
3) पीडित चिमुरडीच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत, कायमस्वरूपी पुनर्वसन, मानसोपचार व कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी. 
4) मालेगाव तालुका व परिसरात लहान मुली-मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम, जनजागृती कार्यक्रम, सीसीटीव्ही व प्रकाश व्यवस्था यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात. 
5) अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचार आणि अल्पवयीन मुलांच्या हत्येच्या गुन्ह्यांविरुद्ध राज्य स्तरावर स्वतंत्र कठोर कायदे/दुरुस्ती करून अल्पावधीत शिक्षा सुनावण्याची कायदेशीर व्यवस्था करण्यात यावी. 
6) वरील मागण्यांविषयी सकारात्मक निर्णय घेऊन तो लवकरात लवकर जाहीर करावा.
        यावेळी महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा दक्षा दयाराम वानखेडे/ सानप, उपाध्यक्ष अनिता विष्णू खेत्रे, सचिव ज्योती सुभाष निकम, सदस्य जनाबाई कडुदास कांबळे, फराह यास्मिन रगीबुर रहमान आणि इतर सदस्य उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी