लिंबागणेश येथे बलिप्रतिपदा निमित्ताने महात्मा बळीराजाला अभिवादन "ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो" घोषणबाजी, सोयाबीन हमीभाव केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावी, अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी

लिंबागणेश येथे बलिप्रतिपदा निमित्ताने महात्मा बळीराजाला अभिवादन "ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो" घोषणबाजी, सोयाबीन हमीभाव केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावी, अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी :- डॉ.गणेश ढवळे 
लिंबागणेश :- ( दि.२२)अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील ७ लाख २१ हजार हेक्टरवरील पिकांचे पुर्ण नुकसान होऊन ८ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. शिवारातील सोयाबीन, कपाशी, तूर यांसह अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. नदीनाल्यांच्या पुरामुळे शेतीबरोबरच जनावरे व शेतीतील साहित्य वाहून गेले असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे.

सरकारने पंचनामे करून "दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा केली जाईल आणि दिवाळी गोड करण्यात येईल" असे आश्वासन दिले होते. मात्र ही घोषणा फक्त कागदावरच राहिली. राज्यात दिवाळीचा प्रकाश साजरा होत असताना शेतकऱ्यांच्या घरात मात्र अजूनही निराशेचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर आज बलिप्रतिपदेच्या दिवशी लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी हक्कासाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रजाहितदक्ष, शेतकऱ्यांचा लोककल्याणकारी दानशूर राजा महासम्राट बळीराजा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

डॉ. ढवळे म्हणाले, “ज्याप्रमाणे वामनाने कपटाने बळीराजाला पाताळात घातले, त्याचप्रमाणे आजचे सरकार आपल्या धोरणांद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक पाताळात ढकलत आहे.”

निदर्शनावेळी “ईडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो” अशा घोषणा देऊन शासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मुख्य मागण्या:

खरडून गेलेल्या जमिनी व विहिरींचे वास्तविक पंचनामे करण्यात यावेत.

विहीर दुरुस्ती अनुदानातील ३० हजार रुपये अपुरे असून त्यात वाढ करण्यात यावी.

८५ रुपये गुंठा मदत ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे; म्हणून भरीव आर्थिक मदत द्यावी.

बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांना जिरायती प्रमाणे मदत देणे अन्यायकारक आहे; यावर पुनर्विचार करावा.

सोयाबीन हमीभाव केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावीत, कारण व्यापारी सध्या ३५००–३८०० रुपयांत सोयाबीनची खरेदी करून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलत आहेत.


या मागण्यांसह निवेदन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना देण्यात आले.

या निदर्शनावेळी सरपंच बालासाहेब जाधव, राजेभाऊ गिरे, कल्याण वाणी, अँड . गणेश वाणी,सेवा सोसायटी चेअरमन रविंद्र निर्मळ, बाळासाहेब मुळे, पांडुरंग वाणी, शिवशक्ती भिमशक्ति विचारमंच प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील, कॉम्रेड सुनील भोसले , विक्रम दाभाडे,सुरेश निर्मळ,बाळकृष्ण थोरात, संतोष भोसले , अशोकराजे वाणी, रामदास मुळे, सुरेश मोरे, दिलीप ढास, हरिभाऊ कदम, अमोल निर्मळ, बबन आबदार, बाबुराव सोनावणे, राजेंद्र ढास , सतिश वायभट, प्रमोद निर्मळ आदी 
शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी