धोकादायक विद्युत रोहित्राला कपड्याने झाकण्याची प्रशासनावर नामुष्की ; सोमवारी "सेल्फी विथ रोहित्र हॅशटॅग अजितदादा" लक्ष्यवेधी आंदोलन :- डॉ.गणेश ढवळे
बीड :- (दि.१८ )मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या बीड दौऱ्या दरम्यान नगरनाका ते कृषी कॉलनी मार्गावरील एसबीआय बँकेजवळ असलेल्या धोकादायक विद्युत रोहित्राला कपड्याने झाकून ठेवण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली. अनेक वर्षांपासून रस्त्याच्या मधोमध असणारे हे रोहित्र व विजेचे खांब नागरिकांच्या जीवाला धोका ठरत असून अपघातांच्या घटनाही घडलेल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्ते व मुख्य प्रचार प्रमुख, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बीड जिल्हा डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी याविरोधात वारंवार निवेदने व आंदोलन केले तरी महावितरण व नगरपरिषद प्रशासन जबाबदारी झटकत आहेत. नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात प्रशासनाने रोहित्र झाकून ठेवून प्रश्न झाकण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे.
नगरनाका ते कृषी कॉलनी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून येथे नाट्यगृह, दवाखाने, शाळा, शिकवण्या असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा गर्दीच्या मार्गावर रस्त्याच्या मधोमध उघडे रोहित्र व लोंबकळणाऱ्या तारांमुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर प्रश्नाकडे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (दि.२२) त्याच ठिकाणी “सेल्फी विथ रोहित्र हॅशटॅग अजितदादा” हे लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येणार असल्याचे डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment