जिल्हा प्रशासनाचा वृक्षलागवडीचा आणखी एक "इव्हेंट" – जिल्हाधिका-यांचे प्रवचन कौतुकास्पद, परंतु "तुती" वृक्षलागवडीबाबत भाष्य न केल्याने पर्यावरणप्रेमी निराश– डॉ. गणेश ढवळे
बीड (दि. १०) : बीड जिल्हा प्रशासनाकडून वृक्षलागवडीचे "इव्हेंट" करण्याची परंपरा कायम ठेवली जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यापूर्वीचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी बिंदुसरा नदीकिनारी १६ किलोमीटर परिसरात ५ हजार बांबू रोपांची लागवड केल्याचा इव्हेंट करून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. मात्र काही महिन्यांतच तेथे खड्डे उरले, झाडे जगवली गेली नाहीत.
आता विद्यमान जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या परंपरेला चालना देत एकाच दिवसात तब्बल ३० लाख वृक्षलागवडीचा इव्हेंट करून इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आपले नाव नोंदवून घेतले. यानिमित्ताने पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला.
जिल्हाधिका-यांचे प्रवचन, पण "तुती"वर मौन...
दि. ९ रोजी वृक्षारोपण उपक्रमाचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले. झाडांमुळे प्रदूषण कमी होणे, उष्णता नियंत्रित राहणे, नागरिकांना शुद्ध हवा मिळणे, जैवविविधतेला चालना मिळणे अशा विविध फायद्यांवर त्यांनी भाष्य केले. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असेही आवाहन केले.
मात्र यावेळी "तुती" वृक्षलागवडीबाबत कोणतेही भाष्य झाले नाही. तुतीची पाने रेशीम किड्यांसाठी खाद्य म्हणून वापरता येतात, परंतु ही लागवड नेमकी किती वर्ष टिकवायची? ३ वर्षांनंतर ती उपटून काढण्यास परवानगी लागणार का? तुतीला खरंच वृक्षलागवडीचा दर्जा मिळतो का? असे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये निराशा पसरली. पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी जिल्हाधिका-यांचा तुतीच्या झाडाने सत्कार करावा, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी विनोदी शैलीत केली आहे.
शासकीय कार्यालयातील वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
दरम्यान, बीडचे जिल्हाधिकारी वृक्षलागवडीबाबत पुढाकार घेत असताना जिल्हा कारागृह आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील साग वृक्षतोडीच्या प्रकरणात मात्र ते मौन बाळगून असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. वारंवार निवेदने व आंदोलने होऊनही या संदर्भात कारवाई न झाल्याने पर्यावरण कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment