धम्म रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि धम्मदेसनेतून उजळणार ६९ वा धम्मचक्र दिन
धम्म रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम आणि 
धम्मदेसनेतून उजळणार ६९ वा धम्मचक्र दिन
बीडमध्ये सहावी बौद्ध धम्मपरिषद:भिक्खु धम्मशील थेरो 
बीड/प्रतिनिधी
सम्यक संबुद्ध गौतम बुद्धांचे मानवी तत्वज्ञान लोकांपर्यंत जावे यासाठी प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था बीडच्या विद्यमाने आयोजित अखिल भारतीय सहावी बौद्ध धम्मपरिषदेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे बौद्ध उपासक-उपासिका,आंबेडकरी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्था सचिव तथा परिषदेचे मुख्य संयोजक भिक्खु धम्मशील थेरो यांनी केले.
   बीड तालुक्यातील महाविहार धम्मभूमी डॉ.भदंत आनंद कौसल्यायन नगर,शिवणी ता. जि. बीड येथे गुरुवार दि.2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत 69 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने अखिल भारतीय सहावी बौद्ध धम्मपरिषद आयोजित करण्यात आली आहे. त्याची माहिती देण्यासाठी तुलसी संगणक शास्त्र महाविद्यालय येथे मंगळवारी दि.30 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी धम्मपरिषदेची माहिती देताना भिक्खु धम्मशील थेरो बोलत होते. यावेळी प्रा.प्रदिप रोडे, भास्कर सरपते, इंजि. वसंत तरकसे आदी उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, सम्यक संबुद्ध सिध्दार्थ गौतम बुद्ध यांनी, जगाला प्रज्ञा, शिल,करुणा याची शिकवण दिली. भारतीय संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपुर याठिकाणी आम्हाला बौद्ध धम्म दिला.त्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाला आज 69 वर्ष पूर्ण होत आहेत. धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ही बौद्ध धम्मपरिषद होत आहे. असे भिक्खु धम्मशील थेरो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या धम्मपरिषदेला धम्म परिषदेचे अध्यक्ष भदंत डॉ.इंदवंस्स महाथेरो, उदघाटक भदंत डॉ.खेमधम्मो महाथेरो, प्रमुख मार्गदर्शक भिक्खु उपगुप्त महाथेरो, स्वागताध्यक्ष इंजि. अशोक येरेकर,  विशेष अतिथी गोल्डमॅन डॉ.रोहित पिसाळ, प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, एसपी नवनीत कॉवत, प्र कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, आयुक्त प्रदिप भोगले, समाज कल्याण सहसंचालक डी. बी.क्षीरसागर, उपायुक्त उमेश सोनवणे, शास्त्रज्ञ डॉ.सिध्दार्थ जोंधळे, प्रमुख धम्मदेसना भिक्खु पय्यातीस महाथेरो, भिक्खु महाविरो थेरो, भिक्खु नागसेन, भिक्खु धम्मघोष, भिक्खु चंद्रमुनी, भिक्खु धम्मप्रिय, भिक्खु पय्यावर्धन, भन्ते बुद्धबोधी आदींची उपस्थिती असणार आहे.या धम्मपरिषदेला उपस्थित रहावे असे आवाहन भिक्खु धम्मशील थेरो यांनी केले.
बीड ते शिवणी मोफत बससेवा 
शिवणी येथे धम्मपरिषदेला जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करण्यात आली असून बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिवणी, बार्शी नाका चौक ते शिवणी सोय करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे नालंदा फाऊंडेशनचे अध्यक्ष  प्रा.प्रदिप रोडे यांच्याकडून भोजनदान दिले जाणार आहे. 
असे होणार कार्यक्रम
बीड शहरातील सामाजिक न्याय भावनापासून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथपर्यंत सकाळी 8 वाजता धम्म रॅली, त्यानंतर  शिवणी येथील धम्मपरिषदेत गुरुवार दि.2 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 12 यावेळेत प्रा.दिपक जमदाडे यांचा भिम व बुद्ध गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment