शेतात अजगर निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण ; घाबरून न जाता वनविभाग अथवा सर्पमित्रांशी संपर्क साधावा
लिंबागणेश (दि. ०९) : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक सरपटणारे जीव आपले पारंपारिक आश्रयस्थान सोडून सुरक्षित ठिकाणांच्या शोधात बाहेर पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील बालाघाटावरील ससेवाडी गावच्या शिवारात रसाळ यांच्या सोयाबीनच्या शेतात रविवारी (दि. ०७) दुपारी शेतमजूर काम करत असताना भला मोठा अजगर दिसून आला. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली.
घाबरलेल्या शेतकऱ्यांनी भीतीपोटी केलेल्या हल्ल्यात त्या अजगराचा मृत्यू झाला. शेतात अजगर दिसणे हे सामान्य नसले तरी पावसाळ्यात ते सुरक्षित जागा शोधण्यासाठी बाहेर पडतात, त्यामुळे अशा घटना घडण्याची शक्यता वाढते.
अजगर दिसल्यास शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, तर त्वरित वन विभाग अथवा स्थानिक सर्पमित्राशी संपर्क साधावा, जेणेकरून अजगराला सुरक्षितरीत्या पकडून जंगलात सोडता येईल. अजगर सहसा मानवांवर हल्ला करत नाहीत, जोपर्यंत त्यांना धोका जाणवत नाही. त्यामुळे अशा वेळी शांत राहून सुरक्षित अंतर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अजगराला त्रास देऊ नये किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment