हरित बीड अभियानाला हरताळ फासणा-या जिल्हा कारागृह अधिक्षकावर प्रशासकीय व दंडात्मक कारवाईसाठी जिल्हा कारागृहासमोर वृक्षप्रेमींची निदर्शने
बीड (दि. ०८):गेल्या महिन्यात हरित महाराष्ट्राच्या धर्तीवर "हरित बीड अभियान" पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आले. एका दिवसात तब्बल ३० लाख वृक्ष लागवड करण्यात आली आणि त्याची नोंद इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली.
परंतु, याच हरित अभियानाला तडा देत गणेश विसर्जनाच्या दिवशी बीड जिल्हा कारागृह आवारातील लिंब, चिंच, कवठ, शेवरी, वड यांसारखी ४०–५० वर्षे जुनी असलेली ५० हून अधिक झाडे बुंध्यापासून कापून टाकण्यात आली. त्याहून गंभीर बाब म्हणजे शासकीय मालमत्ता विक्रीची रीतसर प्रक्रिया न करता झाडे खाजगी वाहनाने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शासकीय कार्यालयाच्या आवारातच झालेली ही वृक्षतोड हा अत्यंत निंदनीय आणि गंभीर प्रकार असल्याने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्यावर प्रशासकीय तसेच दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली." झाडे लावा झाडे जगवा" हरित बीड अभियानाला हरताळ फासणा-या जिल्हा कारागृह अधीक्षकांवर कारवाई झालीच पाहिजे आदी घोषणाबाजी करण्यात आली.
यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कारागृहासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी बीड शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते नगरपरिषद मुख्याधिकारी, वन विभागीय अधिकारी यांच्यामार्फत पालकमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, वनमंत्री गणेश नाईक आणि कारागृह विशेष महानिरीक्षक यांना देण्यात आले. आंदोलन स्थळी पोलिस बंदोबस्त म्हणून एपीआय गजानन क्षीरसागर,पोह.संतोष राऊत, सुनिल राठोड, सुनिता राठोड,मपोह.सुनंदा गुळवे यांची उपस्थिती होती.
निदर्शनावेळी अशोक येडे, जिल्हाध्यक्ष (आप)रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष, इंटक), वृक्षप्रेमी अभिमान खरसाडे, डी .जी.तांदळे (अध्यक्ष म.रा.किसानसभा बीड),नितिन जायभाये (अध्यक्ष बीड शहर बचाव मंच), सय्यद सादेक बीड शहराध्यक्ष (आप),सुदाम तांदळे, शेख मुबीन ,आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment