बीड साठी घंटा गाड्या..बीड शहर बचाव मंचाचे मोठे यश
बीड साठी घंटा गाड्या..
बीड शहर बचाव मंचाचे मोठे यश
बीड शहराला रस्ते व नाल्या कधी मिळणार...
चार घंटा गाड्या देऊन बीडचा विकास होणार आहे का ?
अमृत अटल जल योजनेचे काय चौकशी होणार का ?
बीड प्रतिनिधी - बीड शहर बचाव मंचाच्या प्रदीर्घ लढाईनंतर येणाऱ्या निवडणुकीत होणारी हार दिसू लागल्यामुळे नाईलाजाने का होईना बीड नगर परिषदेला कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या देण्यात येणार आहेत. जसे मोगलांच्या सैन्याला कुठेही, नदीच्या पाण्यातही धनाजी - संताजी दिसायचे तसेच सत्ताधारी पक्षांना व नेत्यांना होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये होणारी हार स्पष्ट दिसू लागलेली आहे. नाईलाज म्हणून आज बीडला घंटा गाड्या देण्यात येत आहेत. बीडची जनता व बीडच्या जनतेच्या वतीने बीड शहर बचाव मंच घंटा गाड्या नियमित चालू राहू द्या व घंटागाड्यांची आपल्याला गरज आहे अशी मागणी सातत्याने गेल्या दोन वर्षापासून करत आहे. बीड शहरामध्ये जागोजागी गल्लोगल्ली कचऱ्याचे मोठ-मोठे ढिगारे लागले आहेत. नाल्या तुंबलेल्या आहेत सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था नाही. बीड शहर हे उकांड्यांचे शहर बनलेले आहे. बीडच्या 70 टक्के भागांमध्ये गेल्या 20 वर्षापासून रस्ते नाल्याच झालेल्या नाहीत. उद्या होणाऱ्या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनीही बीड शहराचा पाहणी दौरा पोलीस संरक्षण विरहित करावा. तुम्हाला बीड शहराची खरी दुर्दशा व बीड शहरातील जनतेचा आक्रोश कळल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 40 वर्षापासून बीडच्या जनतेने मते घेऊन या महाराष्ट्राला व देशाला फार मोठ-मोठे नेते दिले आहेत. एकेकाळचे अटलजीच्या सरकारचे सर्वेसर्वा आदरणीय प्रमोदज महाजन, आ.गोपीनाथर मुंडे , आदरणीय पंकजा मुंडे, आ.प्रीतम मुंडे, तथाकथित डी.एम. वगैरे, केशरकाकू क्षीरसागर, जयदत्त क्षीरसागर व त्यांच्या पुढच्या पिढीतील पिलावळ ही सर्व देशाच्या व राज्याच्या राजकारणातील मोठ-मोठी नावे ऐकल्यावर या सर्व नेत्यांच्या नेतृत्वामध्ये बीड शहराचा व बीड जिल्ह्याचा किती विकास व्हायला पाहिजे होता आणि प्रत्यक्षात किती विकास झालेला आहे हा जनतेने नक्कीच अतिशय गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि खरोखर विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. खरोखरच सत्तेचा उपयोग करून या सर्व नेत्यांना बीडचा व बीड जिल्ह्याचा खूप मोठा विकास करता आला असता. बेरोजगारी नाहीशी करता आली असती. या सर्व नेत्यांकडे इच्छाशक्ती व व्हिजनचा अभाव आहे (बहुदा स्वतःच्या स्वार्थापुढे काही दिसतच नाही). आपल्या खूप नंतर अलीकडच्या काळातही काही निर्माण झालेले जिल्हे आपल्यापेक्षा जास्त विकसनशील आहेत व आपल्यापेक्षा अनेक पटीने प्रगतीपथावर आहेत. एवढ्या सगळ्या मोठ-मोठ्या नेत्यांच्या राजकीय दबदब्यानंतरही आपले बीड मागासलेले कसे राहिले हे एक मोठे रहस्य आहे. आपल्या जिल्ह्याचा आणि बीड शहराचा विकास व्हावा अशी या सगळ्या राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती नव्हती का
का या सर्व नेत्यांनी बीड जिल्ह्याचा विकास केला नाही. का बीड जिल्ह्याच्या आणि बीड शहराच्या विकासाचा अनुशेष एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला. पाणी मुरतय कुठं ? या सर्व बाबींचा बीडचा जनतेने अतिशय गांभीर्याने विचार करायला हवा. या सर्व नेत्यांनी जनतेच्या जीवावर स्वतःच्या पुढच्या पिढ्यांसाठी मोठ-मोठी संस्थाची,कारखान्यांची व अनेक प्रकारच्या उद्योग व्यवसायांची साम्राज्य निर्माण केली आहेत. पण तुमच्या आमच्या पुढच्या पिढीचे काय ? त्यांचे कसे होणार त्यांना वाली कोण ? आज फक्त चार कचऱ्याच्या घंटागाड्या देऊन सगळा विकास साध्य होणार आहे का विकासाचा अनुशेष भरून निघणार आहे का आपल्या बीडच्या जनतेचा मागासलेपणा दूर होणार आहे का ? नाना अनंत प्रश्न आणखीनही तसेच ज्वलंत आहेत. या सर्वांची उत्तरं काय जनतेने अतिशय गांभीर्याने विचार करायला हवा. चार घंटा गाड्या दिल्याने हे सर्व प्रश्न सुटणार आहेत का ? हा बीड शहर बचाव मंचाचा सर्व नेत्या पुढाऱ्यांना प्रश्न आहे व आव्हान आहे की याचे उत्तर द्या.
Comments
Post a Comment