कुशल कर्माचे फळ आनंद देऊन जाते - पूज्य भिक्खु धम्मशील थेरो
( महाविहार धम्मभूमी शिवनी येथे भाद्रपद पौर्णिमा महोत्सव उत्साहात संपन्न )
बीड प्रतिनिधी - प्रियदर्शी धम्म संस्कार शिक्षण संस्था धम्मभूमी डॉ.भदंत आनंद कौशल्यायन मौजे शिवनी ता. जि. बीड येथे 2021 साली स्थापन झाल्यापासून दर पौर्णिमेला नामवंत भिक्खु संघाची धम्मदेशना पूज्य भिक्खु धम्मशील थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मदेशनेचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच विविध थरातील दानशूर, गुणवंत, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, त्यांचा आदर्श समाजाने डोळ्यासमोर ठेवावा म्हणून सत्कार केल्या जातो व बीड परिसरात व संपूर्ण जिल्ह्यात धम्ममय वातावरण निर्माण करून धम्माचा प्रसार व प्रचार केला जातो. भाद्रपद पौर्णिमेचे औचित्य साधून भिक्खु धम्मशील थेरो आपल्या मधुर वाणीने अनेक उदाहरणे देऊन उपस्थित यांना समजावून सांगितले की कुशलकर्माचे फळ आनंद देऊन जाते. याप्रसंगी सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला दीप प्रज्वलन करून प्रमुख अतिथींच्या हस्ते अभिवादन करून त्रिवार वंदन करण्यात येऊन सर्व उपस्थिततांना पूज्य भन्ते यांनी त्रिशरण पंचशील दिले. धम्म देशनेला पूज्य भंते बुद्धबोधी, प्रमुख अतिथी प्रा. हेमंत सौंदरमल, प्रा. प्रदीप रोडे, सेनी सिओ पी.व्ही. बनसोडे, उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर बनकर यांनी केले. प्रा. हेमंत सौंदरमल यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. बाबुराव पोटभरे यांना लोकमत तर्फे देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल सत्कार करण्यात आला तर आयु. एल.आर. रोडे गुरुजी पौर्णिमेनिमित्त भोजनदान त्याबद्दल सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्यावतीने आयोजित महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा सेट उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सचिन शिंदे, आसाराम रोडगे भाग्यश्री रोडगे, नंदिनी जोगदंड, शंकर कांबळे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संस्थेच्या सर्व सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या कर्तव्यातून तसेच आपल्या नियत कर्तव्यातून समाजसेवा कशी घडेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सेवा देणारे जिल्हा रुग्णालय येथील नेत्रतज्ञ नितीन चव्हाण, भोकरदन चे एम एस ई बी चे केशव पगारे, समाजसेविका रमाबाई पगारे, इंजि. श्रीकांत बनसोडे तसेच पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार दैनिक पुण्यभूमीचे सुनील डोंगरे यांना सत्यशोधक पुरस्कार मिळाल्या बद्दल व पत्रकारित क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरणारे दैनिक वादळवार्ताचे कार्यकारी संपादक बालाजी जगतकर व दैनिक आरंभचे पत्रकार दत्तात्रय सौंदरमल यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना हेमंत सौंदरमल व डॉ. नितीन चव्हाण तसेच सर्वच सत्कारमूर्तींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यामुळे शिका संघटित व्हा संघर्ष करा या उपदेशामुळे मिळालेल्या शिक्षणातून मिळालेल्या पदांचा उपयोग पे बॅक टू सोसायटी हा उद्देश लक्षात ठेवून कार्य करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला धम्मदेशना कार्यक्रम प्रसंगी मुख्य देशनेत आपल्या मधुर वाणीने भिक्खु धमशील म्हणाले की तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनात अनेक घटना पौर्णिमेला साक्षी ठेवून घडल्या आहेत वर्षावासातील तिसरी पौर्णिमा म्हणजेच भाद्रपद पौर्णिमा होय. तथागताचा धम्म तथागतांनी जसा भिक्खु साठी होता तसा तो, अनुयायासाठी, उपासक, उपासिकांसाठी गृहस्तांसाठी, ब्रह्मचर्यासाठी, मोठ्यासाठी तसा लहान बालकांसाठी, प्रजेसाठी, राजे महाराजांसाठी होता. जेतवन वनात राहत असलेल्या तथागतांचा अनमोल असा उपदेश ऐकून कोशल राजा प्रसेन्नजीतची धम्मदीक्षा देखील त्याच पौर्णिमेच्या दिवशी संपन्न झाली होती. तथागताच्या मधुर वाणीतील तो धम्म उपदेश सांगताना धम्मशील थेरो उपस्थित उपासक उपासिकांना अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगताना म्हणाले की तथागतांनी उपदेश केवळ गरिबाला किंवा श्रीमंतालाच केला नाही. धम्म एकांगी नाही, तो बहु आयामी आहे. तथागतांनी झोपडीतील सामान्य माणसाला उपदेश दिला तसाच राजवाड्यातील राजाला देखील दिला. जन्म-मरण म्हणजे काय? जिवंत माणसाच्या कल्याणाकरता काय केले पाहिजे याबद्दल उपदेश केला. जिवंत माणसाचे प्रश्न सोडवण्याकरिता सदाचाराच्या जीवनाबद्दल उपदेश केला. मेलेल्या माणसाच्या जीवनाबद्दल ते बोलले नाहीत. राजा हा धम्मिक असला पाहिजे. शील, सदाचारी, कुशल कर्म करणारा असावा जो राजा किंवा राजाचा प्रमुख असतो त्यांचे मन जर धम्मिक असेल तर सर्वांचे कल्याण करू शकतो. त्या ठिकाणी आनंदाचे क्षण येतात व सर्वांना सुख प्राप्त होते. अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. मनुष्याचा जन्म दुर्लभ आहे. माणसाचे मन हे प्रधान आहे. तेव्हा मनाला पापी केले तर बैलगाडीचे चाक जसे बैलांच्या खुरामागे असते तसे दुःख पाठीमागे असते. कुशल कर्माचे फळ सुखदायी तरअकुशल कर्माचे फळ दुःखदायी असते. तेव्हा प्रज्ञा,शील, करुणा मैत्री दान, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून, अंधश्रद्धा,अनिष्ट रूढी परंपराच्या आहारी न जाता धम्मीय प्रेम हे निर्वाणपदी नेऊ शकते. ते केवळ सदाचाराच्या वर्तनाने शक्य आहे. जगाला सध्या शांती व प्रेमाची गरज आहे. जगाला युद्ध नको बुद्ध हवा हे अनेक उदाहरणाद्वारे समजावून सांगितले. गुणवंतांच्या सत्काराविषयी बोलताना भंतेजी म्हणाले की असे कर्म करा की त्याची नोंद दुसऱ्याने घ्यावी. असे कर्म करा की हे दुसऱ्याच्या हिताचे आहे. प्रज्ञा,शील करुणा व दान, सदवर्तनाचे किती महत्व आहे समजून सांगितले. धम्मदेशना किती वेळ जरी चालू असती तरी ती शांत मनाने व एक चित्ताने ऐकण्याची उपस्थितांची मानसिकता होती. कुशल कर्म करा, मन मलीन होऊ देऊ नका. स्वातंत्र्य समता बंधुता न्यायाची कास धरा. असा उपदेश देऊन आशीर्वाद गाथेने व सरणातयने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेकडो उपासक उपासिकाची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष भास्कर सरपंच यांनी केले.
Comments
Post a Comment