सोयाबीन पाण्याखाली शेतकरी आर्थिक संकटात
पंचनामे करून नुकसानभरपाईची लिंबागणेश येथील शेतकऱ्यांची मागणी – डॉ.गणेश ढवळे
लिंबागणेश : (दि.१९)
गेल्या ३-४ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बीड तालुक्यातील लिंबागणेश पंचक्रोशीतील फुलोऱ्यापासून शेंगा लागण्याच्या अवस्थेत असलेले सोयाबीन, मुग, उडीद आदी पिके पाण्याखाली गेली आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिक वाया जाण्याची भीती आहे.
शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी रामकिसन गिरे, रामचंद्र मुळे, रामदास मुळे, अभिजित गायकवाड, जितेंद्र निर्मळ, बाबु आण्णा वायभट, राजेभाऊ गिरे, श्रीहरी निर्मळ, चिंतामण गिरे, अक्षय वायभट आदींनी केली आहे.
"सोयाबीनला बुरशी लागली; पिक वाया" – रामकिसन गिरे
सलग पावसामुळे सोयाबीनमध्ये पाणी साचल्याने मुळांना बुरशी लागली आहे. मुळांना गाठी येऊन वाढ खुंटली असून पिक वाया गेले आहे.
शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी रामकिसन गिरे यांनी केली.
दरम्यान, रामचंद्र मुळे यांनी मागील २-३ वर्षांपासून शासन पंचनामे करूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्याचे सांगितले.
ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसानभरपाई द्यावी" – डॉ.गणेश ढवळे
बीड जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिक पूर्णपणे वाया गेले आहे. शासनाने पंचनाम्याचे आदेश दिले तरी ते प्रत्यक्षात होत नसल्याचे दिसून येते.
शेतकरी आर्थिक संकटात सापडले असल्याने शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment