शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी
शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याची ग्रामस्थांची मागणी
लिंबागणेशकर पालकांचा आक्रमक पवित्रा
लिंबागणेश (दि. १८):
बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत संवर्ग १ ते ४ मधील तब्बल ५ पैकी ४ शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या असून या निर्णयाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. अचानक झालेल्या या बदल्यांमुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने ग्रामस्थांनी बदल्या तात्काळ रद्द करण्याचे निवेदन शिक्षणमंत्री दादा भुसे, खा. बजरंग सोनावणे, आ. संदिप क्षीरसागर तसेच जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांना सादर केले आहे. बदल्या रद्द न झाल्यास पालक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव
आज (दि. १८) सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात तसेच शाळेत पालक व ग्रामस्थांची तातडीची बैठक झाली.
या बैठकीत ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीने ठराव मंजूर केला असून, त्यासह पालकांच्या स्वाक्षरीचे पत्र जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींना पाठवण्यात आले आहे.
या बैठकीस शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर वाणी, पत्रकार हरिओम क्षीरसागर, लेनाजी गायकवाड, अँड. गणेश वाणी, विक्रांत वाणी, दिनेश जाधव, संतोष भोसले, अशोक वाणी, रामदास मुळे, अभिजित गायकवाड, चेतन कानिटकर, तुकाराम गायकवाड, अशोक थोरात, मंगेश जाधव, आनंद बारगजे, संदिप मुळे आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवत्ता वाढवणारे शिक्षक गमावण्याचा धोका
लिंबागणेश शाळेत इयत्ता १ ते ४ पर्यंत सुमारे १२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापक आबासाहेब हांगे व शिक्षक अमर पुरी, संदिपान आगाम, भरत चौरे, माधुरी कुलकर्णी यांच्या प्रयत्नांमुळे या शाळेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या वाढली आहे. इतकेच नव्हे तर गावातील इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारी मुलेही पुन्हा जिल्हा परिषद शाळेत दाखल झाली आहेत.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले होते. अशा परिस्थितीत या शिक्षकांची बदली म्हणजे मुलांच्या भवितव्याशी खेळ असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आंदोलनाची हाक
शिक्षकांच्या बदल्या रद्द न झाल्यास लिंबागणेशकर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा पालक व ग्रामस्थांनी दिला आहे.
Comments
Post a Comment