राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने कंकरसिंह टाक यांचा गौरव
पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्याचे सुप्रसिद्ध कराटे प्रशिक्षक आणि खालसा स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक कंकरसिंह टाक तसेच त्यांचे सहकारी शिक्षक राख भागवत यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदाना बद्दल “राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक (पंचवटी) येथील कालिका मंदिर सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अन्नासाहेब पाटील होते, तर लखुजीराव जाधव यांचे तेरावे वंशज शिवाजी राजे जाधव यांच्या शुभहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सोहळ्यात दुधारे क्रीडा फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक दुधारे, उपाध्यक्ष आनंद खरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.गेल्या १५ वर्षांपासून खालसा स्पोर्ट्स अकॅडमीमार्फत कंकरसिंह टाक यांनी कराटे खेळाच्या माध्यमातून शेकडो मुला-मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास, शिस्त व सामाजिक जाणीव वृद्धिंगत केली आहे. कराटेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना स्वरक्षण, समाजरक्षण, पारिवारिक मूल्यांचे जतन आणि देशसेवेची प्रेरणा दिली आहे. परिणामी तालुका, जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर अकॅडमीतील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पदके पटकावली आहेत.महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर कंकरसिंह टाक यांनी विशेष उपक्रम राबवून महिलांना व मुलींना आत्मरक्षेचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक मुलींमध्ये धाडस आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. क्रीडा क्षेत्रातील योगदानाबरोबरच त्यांनी शालेय शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सहकार्य करत साहित्य वाटप, सामाजिक सेवा उपक्रम, तसेच विविध जनजागृती मोहिमा राबवल्या आहेत.सदर पुरस्कारामध्ये शाल, पुष्पहार, सन्मानचिन्ह व मानपत्र अशा सन्माननीय स्वरूपात गौरव करण्यात आला.या सन्मानामुळे पाटोदा तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव उंचावला असून, कंकरसिंह टाक यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिकांसह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment