अण्णाभाऊ साठे: आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून. लेखक :- सिद्धार्थ शिनगारे
अण्णाभाऊ साठे: आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून. लेखक :- सिद्धार्थ शिनगारे
अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या साहित्यावर आंबेडकरी विचारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. त्यांनी 26 कथासंग्रहा मधून जवळपास 300 कथा, 40 कादंबऱ्या, 15 लोकनाट्य, नाटक, लेख, शाहिरी, गाणे, लावणी, इत्यादी...असे विपुल प्रमाणात अण्णाभाऊंचे साहित्य प्रकाशित आहे. हे ललित लेखन नाही किंवा नुसता शब्दांचा फुलवरा नाही तर अस्सल जिवंत साहित्य त्यांच्या अनुभवातून त्यांनी मांडलेले आहे.
A) त्यांनी लिहिलेल्या आंबेडकरी कथा
1)बुद्धाची शपथ: ही आंबेडकरवादी कथा आहे. जातीव्यवस्था आणि अस्पृश्यते विरोधात बाबासाहेबांनी धर्मांतर केले होते. त्या धर्मांतराचा प्रभाव, गाव खेड्यातील महार जातीवर खोलवर पडला होता. बौद्ध धर्माने झालेला सकारात्मक बदल सूक्ष्म निरीक्षणाद्वारे अण्णाभाऊ मांडतात. आणि या कथेचा शेवट 'बुद्धम् शरणम् गच्छामि' या शब्दांनी करतात.
2)सापळा: डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी चळवळीमुळे समाजामध्ये जे प्रबोधन झाले, याचे वास्तव दर्शवणारी ही कथा अण्णाभाऊंनी लिहिली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात 20 मार्च 1927 ला महाड येथील कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण ठराव पारित झाला.
"मेलेली जनावरे ओढून टाकण्याच्या बाबतीत बहिष्कृत लोकांवर अवलंबून न राहता आपली आपणच व्यवस्था करावी "
या ठरावामुळे महारांणी मेलेली जनावरे ओढणे बंद केले. त्याचे तंतोतंत पालन गाव खेड्यात सुरू होते. त्यामुळे गावातील सवर्ण मंडळी बदला घेण्याची योजना बनवतात परंतु महार जातीचे लोक या सापळ्याला उत्तर देतात. अशी आंबेडकरी कथा अण्णाभाऊ लिहितात.
3)उपकाराची फेड: अण्णाभाऊ साठे यांची ही कथा भारतीय समाजव्यवस्थेतील एक भयाण वास्तव अधोरेखित करणारी आहे. अतिशूद्र समजल्या गेलेल्या, अस्पृश्य जातीमधील ‘अस्पृश्यता’ उपकाराची फेड या कथेतून अण्णा भाऊंनी चित्रित केली आहे. मळू महार, लखू मांग, शंकर चांभार आणि मन्या परीट ही चारही अस्पृश्य जातीतील माणसं. ज्यांच्यावर पिढ्यानपिढ्या धर्माच्या नावावर अन्याय अत्याचार होत आलेला आहे अशा ह्या अस्पृश्य जातीतील चौघांची ही कथा आहे. भारतातील जातीव्यवस्था क्रमिक असमानते वर उभी आहे, अशी जी बाबासाहेब आंबेडकर मांडणी करतात, त्या संदर्भात ही कथा आहे.
4)वळण: शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात, 21/22 मार्च 1920 ला माणगावच्या परिषदेत जे ठराव पारित झाले, त्यातील ठराव क्रमांक 10, “मेलेल्या जनावराचे मांस कोणत्याही जातीच्या माणसाने खाणे हा गुन्हा आहे. असे कायद्याने मानले जावे असा या सभेचा अभिप्राय आहे." नुसार महार लोकांनी जनावराचे मांस खाणे सोडले होते. “ नवती या संग्रहात ‘वळण’ या नावाची एक सुंदर दलित कथा आहे” अण्णाभाऊंनी लिहिली आहे. ज्यामध्ये महार लोकांनी मेलेल्या जनावराची मटन खाणे सोडून दिले होते, या घटनेचा परिणाम महार आणि मांगावर काय होतो, या संदर्भात ही कथा आहे.
5)कोंबडी चोर: खुळंवाडी या कथासंग्रहातील अण्णाभाऊं ची ही एक गाजलेली वरवर विनोदी वाटणारी पण आतून विषमतेवर प्रहार करणारी महत्वाची कथा आहे. स्वतंत्र भारतात आपण स्वतंत्र आहोत का असा मूलभूत प्रश्नही कथा उभा करते. अर्थात या कथेचा आशय ' यह आजादी झूठी है देश की जनता भूखी है', असा आहे.
6) सोन्याचा मणी: आपल्या मुलीकडे राहणारी एक म्हातारी दलित स्त्री, डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला कशाप्रकारे मदत करते अशा आशयाची कथा आहे. मेल्यानंतर तोंडामध्ये सोने ठेवण्याची प्रथा आहे, त्या म्हातारीने एक सोन्याचा मणी त्यासाठी ठेवलेला असतो, परंतु बाबासाहेबांच्या चळवळीसाठी ती तो मणी देऊन टाकते. आंबेडकरी चळवळ ही कष्टकरी कामकरी आणि दलितांच्या त्याग आणि बलिदानावर उभी आहे, अशी या कथेतून अण्णाभाऊ मांडणी करतात.
B) अण्णाभाऊंच्या साहित्यातील आंबेडकरांचा लिखित स्पष्ट उल्लेख :
अण्णाभाऊ साठे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्पष्टपणे उल्लेख त्यांच्या लोकनाट्यात, कादंबरीमध्ये, कथेमध्ये आणि त्यांनी लिहिलेल्या लेखांमध्ये स्पष्टपणे दिसतो, 1946 ला निवडणुकीसाठी त्यांनी ‘देशभक्त घोटाळे’ नावाचे लोकनाट्य लिहिले त्यामध्ये ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव’ हे प्रसिद्ध कवन गायले, 1958 ला त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ या बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या वर्तमानपत्रात ‘दलित शाहिरी’ या मथळ्याखाली एक लेख लिहिला यामध्ये बाबासाहेबांचा स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. त्यांची उत्कृष्ट कादंबरी फकीरा ही 1959 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. अण्णाभाऊंनी, ‘बुद्धाची शपथ’ कथा लिहिली. ज्यामध्ये बाबासाहेबांचा स्पष्टपणे उल्लेख आहे. ‘संयुक्त महाराष्ट्राचा लढा व जातवास्तव’ हा लेख, ‘युगांतर’ मधून प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये बाबासाहेबांचा स्पष्टपणे उल्लेख आहे.
खालील लिखाणामध्ये स्पष्टपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख सापडतो
1) देशभक्त घोटाळे, लोकनाट्य 1946
2) दलित शाहिरी, लेख 1958
3) फकीरा कादंबरी 1959
4) बुद्धाची शपथ, कथा
5) संयुक्त महाराष्ट्राचा लढा व जातवास्तव, हा लेख
C) बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊंची प्रत्यक्ष भेट:
1) रमेश राक्षे यांनी "लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे गौरव ग्रंथ", बार्टी, पुणे यांनी जो ग्रंथ प्रकाशित केला त्यामध्ये "ये आझादी झुठी है " या शीर्षकाखाली लेख लिहिला आहे. "1942 साली 17 जूनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे अखिल भारतीय अधिवेशन भरविले. त्यात सुमारे पन्नास हजार पुरुष व 25 हजार स्त्रिया असे 75 हजार लोक उपस्थित होते. याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय पातळीवर शक्तिप्रदर्शन करून ब्रिटिशांवर दबाव आणण्याचा व त्याद्वारे आपले हक्क अधिकार मिळविण्याचा जोरदार प्रयत्न केला. (या अधिवेशनाला अण्णाभाऊ साठे उपस्थित असल्याचे पुरावे मिळत आहेत. असे लिहिले आहे, पुढे एका भाषणात रमेश राक्षे यांनी ' लोकशाहीर ही पदवी अण्णाभाऊंना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली असे म्हटले आहे.
2) डॉ.बाबुराव गुरव यांनी ‘लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे गौरव ग्रंथ’, बार्टी, पुणे, प्रकाशित ग्रंथामध्ये, ‘लोकशाहीर आणि क्रांतिसिंह’ या लेखामध्ये अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली असे लिहितात. “अण्णाभाऊ साठे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रत्यक्षाची पहिली भेट 1949 साली मुंबईत झाली. अण्णाभाऊ, 1940 पासून बाबासाहेबांना पाहत होते. ऐकत होते. अण्णा भाऊंनी आपली सर्वश्रेष्ठ कादंबरी "फकीरा" डॉ.बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली. अण्णाभाऊंच्या मनावर बाबासाहेबांच्या महानिर्वाणाची घटना कधीही भरून न येणारी जखम करून गेली. असे लिहितात.
3) खुशाल खडसे यांनी ‘शब्द साहित्य का निर्माता अण्णाभाऊ साठे’ नावाचे हिंदी मधून पुस्तक लिहिले, ते लिहितात "कई बार बाबासाहब एवं अण्णाभाऊ इनकी मुलाखत के बारे में पाठक अनभिज्ञ रहते हैं ! डॉ.बाबासाहेब आंबेडकर और अण्णाभाऊ की मुलाकात कब हुई? ऐसे कई सवालात उठाते हैं ! मजदूर सभाओं (ट्रेड यूनियनों) कम्युनिस्ट, देशभक्ति आदि विषयों पर उनके भाषण या तो छापने नहीं दिए जाते थे या एकदम तोड़ मरोड़कर छापे जाते थे ! इसका आंशिक कारण राजनीति रहा है और आंशिक पुराने परंपरागत मिथ्था विश्वास ! मगर उसका जवाब हां है ! आण्णाभाऊ आंबेडकरी विचारों से सिर्फ प्रभावित ही नहीं बल्कि उनकी विचारधारा उसी प्रवाह में थी !
डॉ बाबासाहेब आंबेडकर और आण्णाभाऊ आंठ बार मिलने तथा उनके चर्चा के प्रसंग दिखाई देते हैं ! इसका एक उदाहरण यानी नागपुर का प्रसंग ! 20 अप्रैल 1952 में नागपुर के धंतोली एरिया में मेहाडिया चौक में जहां आज यशवंत स्टेडियम खड़ा है, वहां मजूर पक्ष की सभा हुई ! उस सभा के डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष थे तो आण्णाभाऊ प्रमुख अतिथि थे ! साथ में उस समय के युवा कम्युनिस्ट कार्यकर्ता ए.बी.बर्धन भि थे ! मजुर पक्ष का लाल झंडा और कम्युनिस्ट पक्ष का लाल झंडा इसका संगम हुआ था ! कार्यक्रम के पश्चात आण्णाभाऊ और बाबासाहब के भोजन का आयोजन लक्ष्मण भावे और अन्य साथियों ने किया था ! वह आज भी साक्षी के रूप में जिंदा है!
असे लिहितात.
यावरून हे स्पष्ट होते की डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांची भेट झालेली आहे.
D) निष्कर्ष
1) अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरवादी होते.
2) अण्णाभाऊ साठे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली होती.
3) अण्णाभाऊ साठे पहिले 'आंबेडकरी कथालेखक' आहेत.
4) कम्युनिस्ट विचारधारा भारतातील जातीव्यवस्था नष्ट करण्याच्या दृष्टीने अपुरी आहे. याची जाणीव अण्णाभाऊंना होती.
5) कथा आणि कादंबरीतून जाती व्यवस्थेमधील खालच्या स्तरातील वेगवेगळ्या जाती मधून नायक शोधण्याचे कार्य अण्णाभाऊंनी केले. इतर जातींनी बदलाची, परिवर्तनाची, प्रगतीची, क्रांतीची प्रेरणा घ्यावी असे अण्णाभाऊंना वाटत होते
6) अण्णाभाऊंनी फक्त स्वतःच्या जातीच्याच नव्हे तर समदुःखी जाती समूहांच्या दुःखाला वाचा फोडली.
7) अण्णाभाऊंनी बुद्धाची शपथ कथा लिहून एक प्रकारे 'स्वयंप्रकाशित व्हा' हा मार्ग दाखवला.
8) अण्णाभाऊ, 'जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मला भीमराव' या कवना द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्गच जग बदलू शकतो,असे ठामपणे मांडतात.
9) अण्णाभाऊ साठे फकीरा कादंबरी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण करून, बाबासाहेबांच्या लेखणीला झुंजार उपाधी देऊन, संघर्ष करा, लढा द्या हा बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग दाखवतात.
10) अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारसरणीला पुढे घेऊन जाणारे आहे.
समारोप
अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी, कथा, लोकनाट्य, शाहिरी आणि विविध लेखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला आहे. आंबेडकरी चळवळीचा अभ्यास ते 1942 पासून करत होते. 1956 नंतर ते आंबेडकरी चळवळीकडे वळाले, 1966 पर्यंत ते कम्युनिस्ट चळवळीमध्ये होते. शेवटचे तीन वर्ष त्यांनी कम्युनिस्ट पक्षासोबतचे अथवा कलापथका सोबतचे सर्व संबंध तोडले. अण्णाभाऊ ख-या अर्थाने मानवतावादी होते. आयुष्यभर त्यांनी तत्वाशी तडजोड केली नाही. त्यांचे संपूर्ण साहित्य हे ‘विद्रोही साहित्य’ आहे. शोषित, वंचित, कष्टकरी, दलित, शेतकरी, कामगार, गुन्हेगारी जाती, भटक्या जाती जमाती, यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी साहित्य लिहीले. या सर्व समूहाचे अण्णाभाऊ कैवारी होते.
आज त्यांच्या स्मृतीदीना निमित्त अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन
सिद्धार्थ शिनगारे
अध्यक्ष : भारतीय हितकारिणी संघ
(लेखक, 'अण्णाभाऊ साठे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून', या पुस्तकाचे )
Comments
Post a Comment