चातुर्मासाचे महत्त्व




चातुर्मासाच्या काळात श्रीविष्णु क्षीरसागरात निद्रा घेत असतो, तसेच या काळात पडणार्‍या पावसाच्या पाण्यासह मातीतून नैसर्गिक शक्ती नदीत मिसळत असल्याने या काळात तीर्थक्षेत्री नदीमध्ये स्नान केल्याने पापक्षालन होते. वातावरणात रज-तमाचा प्रभाव वाढल्याने उपवास, व्रतवैकल्ये केल्यास ती अधिक फलद्रूप होऊन सात्त्विकता वाढवतात. चातुर्मासाचे विविध दृष्टीकोनातून असलेले महत्त्व या लेखातून जाणून घेऊया.

१. श्रीविष्णूच्या उपासनेसाठी उत्तम काळ

आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार मासांना ‘चातुर्मास’ म्हणतात. या चार मासांच्या काळामध्ये श्रीविष्णु शेषशय्येवर योगनिद्रा घेत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवसांमध्ये सूर्य कर्क राशीत स्थित असतो. श्रीविष्णूच्या उपासनेसाठी हा काळ उत्तम मानला जातो. सर्व तीर्थस्थाने, देवस्थाने, दान आणि पुण्य चातुर्मास आल्यावर श्रीविष्णूच्या चरणी अर्पण होतात.

२. श्रावण मासाचे महत्त्व

‘भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या ‘श्रीमद्भगवत्गीते’तील संवादात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘मासांमध्ये (महिन्यांमध्ये) मी ‘मार्गशीर्ष’ मास आहे. याचप्रमाणे शिव आणि सनतकुमार यांच्यामध्ये श्रावणमासाबद्दल पुढील आशयाचा संवाद झाल्याचे पुराणात म्हटले आहे. भोलेनाथ शिव म्हणतो,

    द्वादशस्वपि मासेषु श्रावणो मेऽतिवल्लभः । श्रवणार्हं यन्माहात्म्यं तेनासौ श्रवणो मतः ।।

    श्रवणर्क्षं पौर्णमास्यं ततोऽपि श्रावणः स्मृतः । यस्य श्रवणमात्रेण सिद्धिदः श्रावणोऽप्यतः ।।

अर्थ : १२ मासांतील ‘श्रावण मास’ मला अतिप्रिय आहे. त्याचे माहात्म्य श्रवण करण्यास योग्य आहे. त्यामुळे त्याला ‘श्रावण मास’ असे म्हटले जाते. श्रावण या शब्दाची उत्पत्ती ‘श्रवण’ या शब्दातून झाली आहे. ‘श्रवण’ शब्दाचे २ अर्थ होतात. त्यांपैकी एक म्हणजे ‘हिंदु पंचांगातील २२ वे नक्षत्र’, असा आहे आणि दुसरा अर्थ ‘श्रवण म्हणजे ऐकणे.’ श्रावणात श्रवणभक्ती केल्याने सिद्धी प्राप्त होतात. त्यामुळेच हा मास अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो.

३. हिंदु कालगणनेनुसार १२ मासांची नावे ही त्या त्या मासांच्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्रानुसार असणे

हिंदु धर्मात पंचांगातील ५ अंगांपैकी ‘नक्षत्र’ या अंगाला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे हिंदु कालगणनेनुसार १२ मासांची नावे ही त्या त्या मासाच्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्रानुसार आहेत, उदा. चैत्र मासातील पौर्णिमेला चंद्र ‘चित्रा’ नक्षत्रात असतो; म्हणून त्या मासाचे नाव ‘चैत्र’ आहे. श्रावणातील पौर्णिमेला चंद्र ‘श्रवण’ नक्षत्रात असतो. त्यामुळे त्या मासाचे नाव ‘श्रावण’ आहे. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्राचे चैतन्य आणि ऊर्जा त्या संपूर्ण मासात अधिक प्रमाणात कार्यरत असते.

 

४. ‘श्रवण’ नक्षत्राची वैशिष्ट्ये

   शास्त्रानुरुक्तो बहुपुत्रमित्रः सत्पात्रभक्तिः विजितारिपक्षः ।

   चेज्जन्मकाले श्रवणा हि यस्य प्रेमा पुराणश्रवणे प्रवीणः ।।

– जातकाभरण

अर्थ : श्रवण नक्षत्रावर जन्माला आलेला मनुष्य शास्त्रप्रेमी, अनेक मित्र असलेला, मुलाबाळांची आवड असणारा, विधायक कार्ये करणारा, शत्रूंवर विजय मिळवणारा, पुराणश्रवण आदींमध्ये रुची असलेला असतो.

 ५. श्रावण मासातील धर्माचरण म्हणजे ब्रह्मांडातील ग्रह, तारे आणि नक्षत्र यांचे मानवी जीवनावर किंवा चराचर सृष्टीवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असल्याचा पुरावा असणे

हिंदु संस्कृतीचे निर्माते असणार्‍या ऋषिमुनींना याचे सर्व ज्ञान होते. त्यामुळेच त्यांनी आपल्यावर उत्तम आणि उदात्त संस्कार व्हावेत आणि आपल्याला आवश्यक ते धर्मज्ञान सहजपणे मिळावे, यांसाठी श्रावण मासात अधिकाधिक ग्रंथ, कथावाचन, पारायण, व्रतवैकल्ये, दानधर्म इत्यादी करण्याचे मार्गदर्शन केले आहे.

त्यामुळेच वर्षभर मांसाहार करणारे लोक श्रावण मासात मांसाहार पूर्णतः वर्ज्य करतात. बहुतेक घरांत श्री सत्यनारायणाची पूजा अगत्याने केली जाते. श्रावणात प्रत्येक वारानुसार व्रते, विशेष पूजा, उपवास इत्यादी गोष्टी स्त्रिया तर करतातच; पण बहुतेक पुरुषसुद्धा दाढी न करणे, केस न कापणे, तसेच उपवास करणे, घरात श्रीगुरुचरित्र, श्रीनवनाथ माहात्म्य, शिवलीलामृत, शिवपुराण किंवा कुठल्याही धार्मिक ग्रंथांची पारायणे इत्यादी आचारांचे पालन करतातच. त्यामुळे ‘ब्रह्मांडातील ग्रह, तारे आणि नक्षत्रे यांचे मानवी जीवन किंवा चराचर सृष्टी यांवर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतातच’, याचाच हा पुरावा आहे.

तात्पर्य काय, तर हिंदु धर्मशास्त्रातील विज्ञान समजून घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्या जीवनात जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर, ते ते घडवण्यासाठी कटिबद्ध असणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेला या ‘श्रवण’ नक्षत्रामुळे आणि ‘श्रावण’ मासामुळे योग्य ते क्रियमाण वापरण्यासाठी भरपूर प्रमाणात बळ मिळते.

६. तिर्थक्षेत्री नदीत स्नान केल्याने पापांचा नाश होणे

जो मनुष्य चातुर्मासात नदीत स्नान करतो, विशेषतः तीर्थस्थानावरील नदीत स्नान करतो, त्याच्या अनेक पापांचा नाश होतो; कारण पावसाचे पाणी ठिकठिकाणांहून मातीच्या माध्यमातून प्राकृतिक शक्तीला आपल्यासह वाहत आणत नदीच्या वाहत्या पाण्यासह समुद्राकडे घेऊन जाते. चातुर्मासात श्रीविष्णु जलावर शयन करतो; म्हणून जलामध्ये त्याचे तेज आणि शक्ती यांचा अंश असतो. त्यामुळे त्या तेजयुक्त जलात स्नान करणे सर्व तीर्थस्थानांपेक्षाही फलप्रद असते. चातुर्मासात एका बालदीत १ – २ बिल्वपत्रे टाकून ‘ॐ नमः शिवाय ।’ हा मंत्र चार-पाच वेळा जपून स्नान करणे विशेष लाभदायी असते. त्याने शरिराचा वायूदोष दूर होतो अन् आरोग्याचे रक्षण होते.

७. काळे आणि निळे वस्त्र परिधान करू नये

चातुर्मासात काळे आणि निळे वस्त्र परिधान करणे हानीकारक असते; कारण या दिवसांत वातावरण निर्मळ असल्याने सूर्याचे किरण तीव्र होतात आणि हे दोन्ही रंग सूर्याच्या किरणांमधील अन्य सर्व रंगांना समाविष्ट करून घेतात. वर्षाऋतूत सूर्याचे किरण अधिक तीव्र असल्याने शरिराला ते हानीकारक असतात आणि म्हणून हे दोन रंग वस्त्रांसाठी वर्जित ठरतात.

 
८. परनिंदा करू नये

या काळात पानावर भोजन, नामजप, मौन, ध्यान, दान-धर्म आणि उपवास विशेष लाभदायी असतात. चातुर्मासात परनिंदेचा विशेष रूपाने त्याग केला पाहिजे; कारण परनिंदा ऐकणाराही पापाचा धनी होतो. परनिंदा एक महापाप आहे आणि या दोषाचा पापी पुढल्या जन्मीही यशापासून वंचित राहतो.

९. चातुर्मासातील उपवासाचे महत्त्व

चातुर्मासात एकाच प्रकारच्या अन्नाचे भोजन करणारा मनुष्य निरोगी रहातो. केवळ एकवेळ भोजन घेणार्‍याला बारा यज्ञांचे फळ मिळते. जो केवळ पाणी पिऊन रहातो, त्याला प्रतिदिन अश्वमेघ यज्ञाचे फळ मिळते. जो केवळ दूध किंवा फळ खाऊन रहातो, त्याची सहस्रो पापे तात्काळ नष्ट होतात. जो पंधरा दिवसांतून एक दिवस उपवास करील, त्याच्या शरिरातील अनेक दोष नष्ट होतात आणि चौदा दिवसांमध्ये त्याच्या शरिरात भोजन केल्यानंतर जो रस निर्माण होतो, त्याचे शक्तीत रूपांतर होते; म्हणून एकादशीचा उपवास महत्त्वपूर्ण असतो. हे चार मास नामजप आणि तपस्या यांच्यासाठी अतीयोग्य आहेत

१०. चातुर्मासातील व्रतवैकल्यांचे महत्त्व

पावसाळ्यात आपण आणि सूर्य यांच्यात ढगांचा एक पट्टा निर्माण झालेला असतो. त्यामुळे सूर्याचे किरण, म्हणजे तेजतत्त्व, तसेच आकाशतत्त्व एरव्हीइतके पृथ्वीवर पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे वातावरणात पृथ्वी आणि आप तत्त्वांचे प्राबल्य वाढलेले असते. त्यामुळे वातावरणातील विविध जंतू, रज-तम किंवा काळी शक्ती यांचे विघटन न झाल्यामुळे या वातावरणात साथीचे रोग पसरतात आणि आळस किंवा मरगळ जाणवते.

व्रतवैकल्ये करणे, उपवास करणे, सात्त्विक आहार घेणे आणि नामजप करणे यांमुळे आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या रज-तमाचा प्रतिकार करण्यास सक्षम होतो; म्हणून चातुर्मासात व्रतवैकल्ये करतात.

 
श्री. हिरालाल तिवारी
 (सनातन संस्था.) 
संपर्क : 9975592859

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी