अमृत" जल योजनेची सखोल चौकशी करा,बीड शहर बचाव मंचाची जनतेच्या वतीने मागणी
पालक'मंत्र्यांनी या प्रकरणांमध्ये तात्काळ लक्ष घालण्याची गरज आहे. या योजनांची सखोल चौकशी करण्यात यावी .
भुयारी गटार योजनेचे काय झाले...? त्यासाठी मिळालेला शेकडो कोटी रुपये निधी कुठे गेला.?
कालबाह्य झालेल्या व सर्वदृष्टीने धोक्याच्या असलेल्या पाण्याच्या टाक्यांमार्फतच आजही बीड शहराला पाणीपुरवठा होत आहे. कालबाह्य झालेल्या व अनुषंगाने धोक्याच्या झालेल्या पाण्याच्या टाक्या कधी बंद करणार..?
विस्तारित पाण्याच्या टाक्या बांधूनही बराच काळ उपयोगात नसल्यामुळे अजूनही उपयोगशील आहेत का ? याची तपासणी करण्यात यावी.
शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा घरोघरी नियमितपणे कधी होणार..?
बीड प्रतिनिधी :- बीड शहर बचाव मंचाच्या टीमने नुकतीच बीड शहरातील बऱ्याच भागांमध्ये अमृत जल योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या विस्तारीत पाण्याच्या टाक्या व पाणीपुरवठा नळ योजनेची पाहणी केली. बऱ्याच कालावधीपासून इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण तयार झालेले असून सुद्धा अमृत जल योजना कार्यान्वित का केली जात नाही..?
हा बीड च्या जनतेपुढे पडलेला फार मोठा प्रश्न आहे. केंद्र शासनाकडून शेकडो कोटी रुपये या योजनेसाठी पुरविण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगरपालिका प्रशासन अशा संयुक्त पद्धतीने ही योजना राबविण्यात आली. नगरपालिकेकडून योजना हस्तांतरित करून घेऊन मोठ्या थाटामाटात त्या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या विस्तारीत पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन सोहळे करण्यात येऊन लोकार्पण करण्यात आले. हजारो हजारो घरांना निळ्या पाईपचे कनेक्शन्स देण्यात आले. पाणी पुरवठ्याचे ट्रायल्स' देण्यात आले. या योजनेतून दिलेले नळ घरोघर आज निकामी पडून आहेत. अशाप्रकारे एका मोठ्या जलपुरवठा योजनेचे वाटोळे जर बारामती मध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये झाले असते तर माननीय पालक'मंत्री अजित दादा आपण हे असेच सहन केले असते का .? असा प्रश्न बीड शहरातील जनतेच्या वतीने बीड शहर बचाव मंच' आपल्यासमोर मांडत आहे. अमृत जल योजना शेकडो कोटी रुपये खर्च करून देखील अयशस्वी झाली . केंद्र शासनाच्या शेकडो कोटी रुपयांचा नासाडा करण्यात आला. फार मोठा भ्रष्टाचार या योजनेत झाला आहे,याची शक्यता नाकारताच येत नाही. ही योजना योग्य पद्धतीने प्रामाणिकपणे राबवण्यात आली असती तर बीडच्या जनतेचा पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याचा प्रश्न कधीच सुटला असता व बीडकरांना पाण्यासाठी वणवण हिंडावे लागले नसते. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची होणारी भीषण टंचाई थांबवण्यात यश आले असते आणि बीडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला असता यात काहीच शंकाच नाही.
अशाच प्रकारे भुयारी गटार योजनेसाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडून निधी आलेला होता. भुयारी गटार योजना कुठ आहे...? त्यासाठी मिळालेला निधी कुठे गेला..? भुयारी गटार योजनेच्या अंतर्गत फिल्टर प्लांट उभा करण्यासाठी जमीन घेतली होती व फिल्टर प्लांट उभा करण्यात येणार होता . कुठे आहे तो फिल्टर प्लांट ? त्या फिल्टर प्लांट चे व त्यासाठी खरेदी केलेल्या जमिनीचे काय झाले ? भुयारी गटार योजना कोणी व कशी जिरवली ?? याची जवाबदारी कोणावर आहे?
या योजना विकासाच्या कुठल्या टप्प्यावर आहेत, कधीपासून कार्यान्वित होतील, शासनाने जनतेसाठी शेकडो कोटी रुपये खर्च केल्यानंतरही या योजना बारगळत पडल्या आहेत याचा लाभ जनतेला कधीपासून मिळणार याचा खुलासा प्रशासनाकडून व संबंधित नेत्या पुढार्यांकडून तात्काळ करण्यात यावा ही मागणी जनतेच्या वतीने बीड शहर बचाव मंचा कडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment