' तिम्मा ' म्हणजे गुलामगिरीच्या पलिकडे माणसांनी माणसांचा केलेला कोंडमारा-सुभाष सोनवणे
' तिम्मा ' म्हणजे गुलामगिरीच्या पलिकडे माणसांनी माणसांचा केलेला कोंडमारा-सुभाष सोनवणे,अ.नगर
दीर्घ वेदना अक्रांदणे आणी शून्य नजरा घेऊन जगणा-या अनेक मानवांचे समुह ह्या देशातील जाती पातींच्या व धर्मांच्या बंधनात बांधलेली आहेत. ती मानसं समाजाच्या परिघा बाहेर गावकुसांच्या रेषे बाहेर आजही सततच आपल्या मनाला मारुन. वेदनेच्या आगीत होरपळत होरपळत.... आपला जीव मुठीत धरून अनेक वर्षापासून ह्या देशामध्ये जीवन जगत आहेत. अतिशय काष्टांची कामे ही माणसं सतत करतात. त्या साठी शेकडो मैल भटकांती करतात. कधी कधी त्यांना काम ही मिळत नाही. दिवस दिवस उपाशी राहावे लागते. अत्यंत हिन दर्जाची वागणूक यांना समाजा कडून मिळत असते. जाती पातींच्या मिळालेल्या शिक्या बरोबरच "चोरी करणारी माणसं" हा सुद्धा शिक्का त्यांच्या कपाळावर समाजा कडून गोंदला गेलेला आहे. त्यांच्या अंतर्बाह्य मनाचा सततच कोंडमारा होत असतो.
असे जीवन जगणारे भटक्या समाजातील घिसडी,शिकलकरी, कोल्हाटी, लोहार, पारधी, जोशी, चित्रकथी, मातीवडारी, गाडी वडारी ,दगड वडारी, रामोशी, कैकाडी,पिंगळा,डवरी, गोसावी वगैरे....
दगड वडारी त्यापैकीच एक . पोटासाठी गावोगावी भटकायचे मिळेल तेथे दगड फोडून उदारनिर्वाह करायचा. दगड फोडणे काही साधे काम नाही. पुष्कळदा जीवावरही बेतते .तरीही लोकांना त्यांच्या विषयी प्रेम नाही.आपुलकी नाही.उलट त्यांचा अपमान करायला गावातली सगळेच मोकळे. अशा अनेक जाती समूहांचा दीर्घ वेदनामय पट आजपर्यंत कधी लिहिलाच गेलेला दिसून येत नाही. हजारो वर्ष अशी माणसं जीवन जगत जगत आली आणि काळाच्या पडद्याआड सुद्धा गेली. त्यांची दखल कोणी घेतली नाही त्यांच्या वेदना कोणी जाणून घेतल्या नाही. किंवा त्यांच्यावर काही लिहिले सुद्धा गेलेले नाही.
लेखक प्रा.डॉ.प्रकाश जाधव यांच्या तिम्मा ह्या कादंबरी मधील भटक्या वडारी लोकांच्या जीवनातील वेदना त्यांची अक्रांदणे त्यांच्या कळवळून दिसणाऱ्या शून्य नजरा...एकंदरीत त्यांचा प्रचंड संघर्ष हा खरं म्हणजे अंतर्मनाला पिळून टाकणारा वास्तववादी भाग आहे. वेदनांच्या अश्रुनी भिजून टाकणारा असा आहे. तो प्रचंड वेदनेने भरलेला आहे. त्या वडारी लोकांच्या जीवनातील लाचारी , असहाय्यता हतबलता, भयग्रस्तता ह्या सगळ्यांची परिणीती म्हणजे त्यांचं दु:खमय जगणं हे अतिशय प्रगल्भपणे लेखकाने मांडलेला एक साहित्यातील अनमोल ठेवा म्हणजे... तिम्मा होय.
गावाच्या बाहेर माळरानावर त्यांची पालं... सर्व माणसं बायकांसह दूर दगड फोडण्याच्या कामावर गेलेली.
पालामध्ये फक्त लहान मुलं आणि काही म्हातारी माणसं . प्रचंड वादळ वाऱ्यासह आलेल्या पाऊस. त्या पावसाने माळरानावर झालेला सगळा चिखल. वादळ वा-याने त्यांची उडून दूर गेलेली पालं . लहान लेकरं व ज्येष्ठ वयस्कर माणसं त्या वादळ वाऱ्यात पावसात तक धरून आपल्या दूर गेलेल्या माणसांची वाट पाहत बसलेली.रात्री झोपाव कोठे सर्वत्र प्रचंड चिखल.खायला काही नाही.दिवसभर काम करुन दमुन आलेली मानसं... झोपेसाठी गावातील चावडीत निवारा मिळावा म्हणून सर्वांना घेवून गावात पाटलाकडे जातात. पाटलासह गावकरी तुम्ही चो-या करतात.असे म्हणुन शिवीगाळही करुन हुसकावून लावतात. पुन्हा दूर माळावर येवून त्या चिखलात उपाशीपोटी जागतच रात्री ती मानसं काढतात. असे ह्रदय पिळवटून टाकणारे अनेक प्रसंग गलबलून टाकतात.
ह्या अशा अनेक संघर्षाची रूपे प्रभावीपणे लेखक मांडत असताना त्यातील एक प्रसंग माणसातील माणूस पणाचे वाभडेच काढतो.
वडा-यांची एक म्हातारी मरते. तेव्हा तिचा अंत्यविधी कोठे करावा असा प्रश्न वडा-यांना पडतो. कारण त्यांना तर गाव नसते. तेव्हा ते पाटला कडे जातात. पाटील त्यांना सांगतो की महार मांगाच्या स्मशानात अंत्यविधी करा. परंतु मांगा महारांना मात्र हे मान्य नाही. त्यांचे म्हणणे असे की, त्यांचे आमचे कसे जमेल ! जाती वेगळे आहेत. आणि मुख्य म्हणजे, ते उपरे आहेत.तेव्हा त्यांचे प्रेत आमच्या स्मशानात नको. मोठा तणाव निर्माण होतो. खुप तासांनी पाटलाच्या मध्यस्थीने प्रसंग मिटतो.
गावक-याच्या शेतातील पिकाची चोरी न करता आलेले चोरीचे आळ मारहाणी सह गाव सोडून जाण्यास भाग पाडते. दुस-या दूरच्या गावी जातांनी एका गरोदर महिलेचे रस्त्यातच उघड्यावर बाळंत होणं. हे असे प्रसंग वाचतांनी डोळे पान्हवतात.
दगड फोडण्याच्या व खडी मशिनच्या कामावर सुध्दां मोठ्या प्रमाणात होत असलेली अर्थीक लूट. त्यांच्या स्त्रियांच्या फाटक्या लुगड्यातुन दिसणाऱ्या शरिराकडे समाजाच्या वखवखलेल्या सततच रोखलेल्या वाईट नजरा.महिलांचा लाज झाकण्यासाठी होत असलेला कोंडमारा.....
ह्या अशा अनेक मानुसपण हारपलेल्या त्यांच्या व्यथेंच्या कथा. आपन सुध्दा मानसच आहोत. गावातली सुध्दा मानसच आहेत. मग एव्हढी मोठी प्रचंड विषमता कशी ? असा प्रश्न सततच अनेक पिढ्यां पासून ह्या व्यथितांना पडलेला. "आंधळ्या डोळ्यांची उघडझाप व्हावी. अन् काहीच दिसू नये. तोच तो गडद अंधार.... जगात असूनही माळरानावरील पालात एकाकी एकटे.... विषमतेच्या खोल अंधारलेल्या दरितील भयवाह भिती गत"...... असा पडलेला प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देत नाही.आणी मग मनःशांती साठी व झोप येण्यासाठी ते दारुला जवळ करतात.दारु पितात. आर्थिक भावनिक शारीरिक व माणूसकीची होत असलेली लूट ह्या बाबद नशेत बडबडतात. शिवीगाळी करत बायकांशी भांडतात.
तिम्मा ह्या कादंबरी मध्ये लेखकाने तिम्माला केंद्रस्थानी ठेवून अंतरमनाचा वेध घेणारे एक वास्तववादी व्यथामय चरित्र मांडले आहे. लिहिले आहे. आणी म्हणुनच असे म्हणावे लागते की,
काहींच्या भावना काहींचे मने
दोन्ही एकत्र येणार केव्हा
काहींचे सुख काहींचे दुःख
विरह वेदना संपणार केव्हा
ही जात ती जात
गंजलेले जाती धर्म संपणार केव्हा
माणूस पणातील माणुसकीला
जाग तरी येणार केव्हा
जाग तरी येणार केव्हा
आणी म्हणुनच समाजाला विचार करावयास लावणारी.... दिशा दर्शक अशी ही कांदबरी आहे.तिम्माच्या वास्तववादी लेखना बाबद लेखक प्रा.डॉ. प्रकाश जाधव यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
त्यांच्या आगामी साहित्यिक क्षेत्रातील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
सुभाष सोनवणे,अ.नगर
साहित्यिक/व्याख्याते
मो.क्र. ९८६०१५९४९१
Comments
Post a Comment