आमदारांनी स्टंट करू नये, नाळवंडीप्रमाणे राजुरीतील बोगसगिरीची चौकशी करणार का?नाळवंडीचे सरपंच ॲड.राजेंद्र राऊत यांचा सवाल
आमदारांनी स्टंट करू नये, नाळवंडीप्रमाणे राजुरीतील बोगसगिरीची चौकशी करणार का? नाळवंडीचे सरपंच ॲड.राजेंद्र राऊत यांचा सवाल; आमदारांच्या कामांचे ‘पोस्टमार्टम’ करू
बीड (प्रतिनिधी)
दि.१४ : बीड मतदारसंघात नरेगा अंतर्गत झालेल्या कामांची आमदार संदीप क्षीरसागर यांनी पाहणी केल्यानंतर नाळवंडीचे सरपंच ॲड.राजेंद्र राऊत यांनी आपणही आमदारांच्या कामांचे ‘पोस्टमार्टम’ करू शकतो, असा इशारा दिला आहे. नाळवंडीमध्ये अचानक पाहणी करून स्टंटबाजी केली जाते, पण नवगण राजुरीसारख्या गावांमध्ये झालेल्या मोठ्या गैरव्यवहारांचीही चौकशी आमदार करणार आहेत का? असा थेट सवाल करत ॲड.राऊत यांनी आमदारांनी स्टंटबाजी थांबवावी, असे म्हटले आहे.
नाळवंडी ग्रामपंचायतीने नरेगा अंतर्गत नियमांचे पालन करत कामे केली असून, संबंधित कामांची यापूर्वीच चौकशी झाली आहे, समितीचे अहवाल पाहूनच बिले अदा केली आहेत, आताही रस्ते लोकांच्या वापरात आहेत, कोणत्याही ग्रामस्थाची तक्रार नाही, असे ॲड.राऊत यांनी स्पष्ट केले. सदरील कामांवर आमदारांनी जाऊन केवळ फोटोसेशन केले. ते सध्या काही निवडक गावांमध्येच लक्ष केंद्रित करत असून, त्यांनी शिफारस केलेल्या कामांची चौकशी होईल का? त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये झालेल्या बोगसगिरीची चौकशी लावतील का? असे सवाल ॲड.राऊत यांनी उपस्थित केले आहेत. जर आमदारांना खरंच भ्रष्टाचारविरोधी लढा द्यायचा असेल, तर मग नवगण राजुरीसारख्या स्वतःच्या आणि निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांच्या गावांमध्ये झालेल्या बोगस कामांचीही पाहणी करून वस्तुस्थिती मांडावी. निवडणुकीच्या तोंडावर निवडक गावांमध्ये जाऊन स्टंट करून जनतेची दिशाभूल करणे थांबवावे. शासनाच्या निधीचा अपव्यय कोठे झाला असेल, तर संबंधितांवर कारवाई व्हावी, याला आमचाही पाठिंबा आहे. पण कारवाई ही निवडक नसून सर्वसमावेशक असली पाहिजे, अशी भूमिका सरपंच ॲड.राजेंद्र राऊत यांनी मांडली. न्याय हवा असेल, तर तो सर्व गावांना सारखाच मिळाला पाहिजे, असा ठाम इशारा ॲड.राजेंद्र राऊत यांनी दिला आहे.
बीडचे आमदार बीड ते नाळवंडी रस्त्याचा प्रश्न कधी सोडविणार?
बीड तालुक्यातील बीड ते नाळवंडी हा रस्त्याचा प्रश्न ज्वलंत आहे. आमदारकीच्या संपूर्ण कार्यकाळात आमदारांनी या रस्त्याविषयी तोंडातून ब्र शब्द काढला नाही. परंतु लोकांच्या उपयोगात येत असलेल्या गावांतर्गत रस्त्यांची चौकशी लावण्याचा खटाटोप त्यांनी सुरू केला. आहे. चौकशीमध्ये वारंवार तोंडावर पडल्यानंतरही आमदारांकडून स्टंट थांबविला जात नाही, असे ॲड.राऊत यांनी म्हटले आहे.
हिंमत असेल तर नाळवंडीतील जलजीवनच्या कामाची चौकशी करा!
नाळवंडीतील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत होत असलेले काम दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. त्याचा गावातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असून ग्रामस्थांना सध्याही पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या कामात आमदारांचे समर्थक सहभागी असल्याने चौकशी लावली जात नाही. हिंमत असेल तर या कामाची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, असा इशारा ॲड.राजेंद्र राऊत यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment