जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी घेतली कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर बैठक-भाई गौतम आगळे सर
परळी (प्रतिनिधी) रोजंदारी मजदुर सेना या संघटनेच्या वतीने एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांना किमान वेतनासहित विविध कामगार कायद्यांच्या सोयी सवलती व नगरपरिषद बीड मधील कंत्राटी सफाई कामगारांना तात्काळ कामावर घ्यावे या करिता संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष तथा कामगार प्रतिनिधी भाई राजेश कुमार जोगदंड यांनी सलग ११ दिवस अन्नत्याग उपोषण केले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार दि. १३.०५.२०२५ सकाळी 11: 30 वाजता जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत, सरकारी कामगार अधिकारी, रोजंदारी मजदूर सेना केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांची संयुक्त बैठक घेऊन कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाचा निपटारा करण्यात येइल, असे लेखी पत्र विक्रम मांडुरके, जिल्हा सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी दिले होते. त्या प्रमाणे नियोजित बैठक मा. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. अशी माहिती कामगार नेते भाई गौतम आगळे सर यांनी दिली.
सदरील बैठक तब्बल दिड तास उशिरा सुरू झाली. बैठकिच्या सुरुवातीला जिल्हा सह आयुक्त विक्रम मांडुरके यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत यांची ओळख करून दिली तर संघटनेचे पदाधिकारी व कामगार प्रतिनिधी यांचा परिचय संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष राजेश कुमार जोगदंड यांनी करून दिला.
संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी बीड जिल्ह्यातील सफाई कामगार सहित इतर कंत्राटी कामगारांना किमान वेतन व विविध कामगार कायद्याच्या सोयी सवलती मिळत नसल्याने मागील ०८ वर्षापासून मंत्रालय मुंबई, आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर आंदोलन करून न्याय मागत आहोत. आंदोलनाच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम,एम.डी.सींह, राहुल रेखावार अस्तिक कुमार पांडे, राधा बिनोद शर्मा, दीपा मुधोळ यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठका संपन्न होऊन त्यांनी कामगार कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही.अशी तक्रार कामगार नेते आगळे सर यांनी केली. तसेच किमान वेतन व इतर विविध कामगार कायद्याच्या सर्व सुविधा मिळाव्यात या साठी नगर परिषद बीड समोर लोकशाही मार्गाने आंदोलन केले असता फक्त सफाई कंत्राटी कामगारांना दि.०१ जून २०२२ रोजी अयोग्य व बेकायदेशीरपणे कामावरून कमी केल्यामुळे बीड शहरात मागील २३ महिन्या पासून घाणीचे साम्राज्य पसरले आहे, अशी तक्रार केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी सर्व मुख्याधिकारी यांना विचारणा केली, त्यावर त्यांनी किमान वेतन देतो तसे सांगितले. परंतु सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळीं जाऊन पाहणी करून अहवाल सादर केला त्यात हे सर्वजण खोटे बोलतात हे सिद्ध झाले. कंत्राटी कामगारांना त्यांचे मुलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी मा.मनोज रानडे (भा.प्र.से.)आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांचे कार्यालया समोर सन MARCH 2023 रोजी अर्धनग्न आंदोलन करून आमरण उपोषण केले. त्यामुळे दिनांक 26.08.2024 रोजी एक आदेश निर्गमित केला होता. त्यात कामगार कायद्याचे पालन झाले नाही तर मुख्याधिकारी संबंधित कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे नमूद केले होते. त्याप्रमाणे दोषी अधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आगळे सर यांनी केली. त्यावर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्हा सह आयुक्त विक्रम मांडुरके, नगरपरिषद विभाग जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना संपूर्ण अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश देउन बीड शहरातील स्वच्छतेसाठी आणि सफाई कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक लावण्याचे आदेशही दिले. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषद/ नगरपंचायत संबंधित कर्मचारी रोजंदारी मजदुर सेना, पदाधिकारी व कंत्राटी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.अशी माहिती संघटनेचे केंद्रीय महासचिव भाई गौतम आगळे सर यांनी दिली.
Comments
Post a Comment