एकल महिलांच्या प्रश्नावर राज्य सरकार सकारात्मक - बाजीराव ढाकणे
बीड प्रतिनिधी :- जेष्ठ समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली साऊ एकल महिला समितीचे राज्यभरातील कार्यकर्ते मागिल पाच वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील एकल महिलांच्या विविध प्रश्नावर राज्य सरकार बरोबर पत्रव्यवहार, बैठका व निवेदनाद्वारे झगडत असुन त्या प्रत्येक गोष्टी सरकार कडून सुरू करून घेण्यात यशस्वी होत आहे असे सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे यांनी म्हटले आहे.
आज मंगळवार दिनांक १३ मे रोजी मुंबईत मंत्रालयात एकल महिलांच्या प्रश्नावर महिला व बालकल्याण मंत्री नामदार आदितीताई तटकरे यांनी एकल महिलांच्या प्रश्नावर बैठक घेतली. या बैठकीस आमच्या साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब दादा कुलकर्णी व अभ्यासू कार्यकर्ते मिलिंदकुमार साळवे सहभागी झाले होते.
या बैठकीत एकल महिलांचे सर्वेक्षण करणे, बालसंगोपन योजनेचे पैसे दर महिन्याला नियमित मिळणे,तालुका स्तरावर या महिलांसाठी समित्या तयार करून सक्रीय करणे, एकल महिलांसाठी कमी व्याजदराची व्यक्तिगत कर्ज योजना तयार करणे असे अनेक मुद्दे मांडले. त्याला सन्माननीय मंत्री व अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल राज्य सरकार व संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी यांचे साऊ एकल महिला समितीचे बाजीराव ढाकणे यांनी आभार मानले आहेत.
Comments
Post a Comment