राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचे बीडमध्ये उत्साहात स्वागत
बीड (प्रतिनिधी)
दि.३० : संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५ अंतर्गत निघालेल्या गडकिल्ले, माती आणि नद्यांचे जल-कुंभ रथयात्रेचे बुधवारी (दि.३०) दुपारी १ वाजता बीडमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या गौरव रथयात्रेच्या माध्यमातून राज्याच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या थोर महापुरुषांचा परिचय नव्या पिढीसमोर मांडला जात असून, महाराष्ट्राच्या इतिहासाला उजाळा देण्याचा हेतू ठेवण्यात आला आहे. ही रथयात्रा संपूर्ण राज्यभर फिरणार आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही यात्रा पोहोचल्यावर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत झाले. स्वागत समारंभावेळी प्रमुख समन्वयक आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी सेवादलाचे राज्य कार्याध्यक्ष शिवाजी बनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, तसेच बळीराम गवते, शेख तय्यब, शेख निजाम, हारून इनामदार, फारूक पटेल, नगराध्यक्ष सीता बनसोड, बाजीराव धर्माधिकारी, प्रा. ईश्वर मुंडे, रेखा फड, ॲड. प्रज्ञा खोसरे, दीपक घुमरे, प्रिया डोईफोडे यांच्यासह राज्य व जिल्हा पातळीवरील अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ही महाराष्ट्र गौरव रथयात्रा गेवराईच्या दिशेने पुढे मार्गस्थ झाली.
Comments
Post a Comment