प्राथमिक पदवीधर शिक्षकांचे उपोषण तात्पुरते स्थगित
प्राथमिक पदवीधर शिक्षकांचे उपोषण तात्पुरते स्थगित

युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागरांची मध्यस्थी; ना.अजितदादांसमोर प्रश्न मांडण्याची ग्वाही
बीड (प्रतिनिधी)
दि.३० : जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक पदवीधर, भाषा व सामाजिक शास्त्र विषयाच्या ७४ शिक्षकांनी गणित व विज्ञान विषयांत रूपांतर करण्याच्या मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू होते. उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.२९) भेट देत शिक्षकांशी संवाद साधला. त्यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
डॉ.योगेश क्षीरसागर यांनी म्हटले की, शिक्षकांच्या मागण्या न्याय्य असून त्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या जातील. उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत शासनदरबारी पाठपुरावा करून या मागण्यांची योग्य ती दखल घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शिक्षकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांच्याद्वारे शिक्षकांना निरोप पाठवला आणि त्यानंतर उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. या भेटीदरम्यान आनंद पिंगळे, सुमंत खांडे, विजय खोसे, सुमेध जोगदंड, दिपक घाटे, विकास गवते, दिलीपकुमार सानप, जितेंद्र सांगळे, निलेश चव्हाण यांच्यासह शिक्षक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, शिक्षकांनी आपल्या मागण्यांकडे शासनाने तत्काळ लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment