पत्रकार संघ आणि आश्रय सेवा केंद्राच्या वतीने कर्तबगार महिलांचा शानदार गुणगौरव सोहळा संपन्न



शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी सक्षम व्हावे - निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी

स्त्रीला संपत्तीपेक्षा सन्मान महत्त्वाचा - सौ. प्राजक्ताताई धस

बीड प्रतिनिधी 
स्त्रियांनी सक्षम व्हावे अशी भूमिका शासन आणि प्रशासनाची आहे.प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवावा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःसाठी नवे मार्ग शोधले पाहिजेत असे आवाहन निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले. तर स्त्रीला संपत्तीपेक्षा सन्मान अधिक महत्त्वाचा आहे. परिस्थिती एका दिवसात बदलत नाही, परंतु महिलांनी पुढे येऊन संघर्ष करणे आवश्यक आहे. समाजाचा दृष्टिकोन बदलला तरच खऱ्या अर्थाने समानता प्रस्थापित होईल असे मत सौ. प्राजक्ता सुरेश धस यांनी व्यक्त केले.
बीड येथील हॉटेल नीलकमल येथे जागतिक महिला दिनी शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई दैनिक समर्थ राजयोग आणि आश्रय सेवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्त्रीरत्न पुरस्कार सोहळा 2025 चे शानदार वितरण मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अँड.उषाताई दराडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, दैनिक दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोष मानूरकर, प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक पूजा पवार, कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, बीडचे गटशिक्षणाधिकारी खान समंदर हमीद खान, ज्येष्ठ महिला उद्योजक निर्मलाताई खटोड, केज नगरपंचायतच्या नगराध्यक्ष सीताताई बनसोड, केज जनविकास आघाडीचे प्रमुख हारूण भाई इनामदार, प्रसिद्ध उद्योजक गौतम शेठ खटोड, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सानप, पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी, पत्रकार संघाच्या महिला जिल्हाध्यक्ष शेख आयेशा यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलाने आणि अनिता वाघमारे यांनी स्त्री शक्तीवर सुंदर रचना तयार करून गायलेल्या स्वागत गीताने झाली. 
पुढे बोलताना निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी म्हणाले, महिला खऱ्या अर्थाने परिपूर्ण असतात. त्या अबला नसून सबला आहेत. फक्त महिलांनी आपल्यातील आत्मविश्वास कायम जागृत ठेवावा. परिस्थिती काळानुसार बदलत असते. त्याप्रमाणे महिलांची कालची परिस्थिती आज नक्कीच बदललेली आहे. शासन आणि प्रशासन महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील आहे. याचा लाभ महिलांनी घेऊन स्वतःसह आपल्या कुटुंबाचा विकास करावा असे आवाहन केले. 
याप्रसंगी पुढे बोलताना सौ. प्राजक्ता सुरेश धस म्हणाल्या, स्त्रियांवर अत्याचार होतो हे वास्तव आहे. मी देखील अनेक अन्यायग्रस्त प्रसंगातून पुढे इथपर्यंत आलेली आहे. आमदार सुरेश धस यांची पत्नी म्हणून माझी ओळख असली तरी देखील मी माझे कर्तुत्व एक स्त्री म्हणून निर्माण करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. माझ्यावर विनाकारण राजकीय अन्याय झाला तो कसा झाला आणि कोणी केला ? याचा परखडपणे त्यांनी नाव घेऊन पर्दाफाश केला. त्या पहिल्यांदाच अगदी मनमोकळेपणाने आपल्या आयुष्यातील 14 वर्षाचा वनवास कसा काढला यावर व्यक्त होत आपल्या जीवनाचा उलगडा केला. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार संतोष मानूरकर, पहिल्या महिला उद्योजक निर्मलाताई खटोड, एलसीबीचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, त्याचबरोबर सत्कारमूर्ती यांच्या पैकी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये डॉक्टर मीरा ढाकणे, सौ.चंपावती काकी पानसंबळ, अनिताताई वाघमारे, सौ.जयश्रीताई विधाते, द्वारका कांबळे, सौ.प्रतिभा शिनगारे, उम्मेहानी शेख, मेधा गोसावी आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार लोकजगतच्या संपादक शेख आयेशा यांनी मानले. कार्यक्रमास सत्कारमूर्ती, त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र परिवार त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची शानदार सांगता झाली. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन महादेव इनकर सर व सौ विश्वमाला इनकर यांनी केले. 

स्त्रिया या आयुष्यातील खऱ्या अभिनेत्री आहेत - माजी आ. अँड. उषाताई दराडे
पडद्यावरच्या अभिनेत्री असल्या तरी सुद्धा आयुष्य जगत असताना खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या सामान्य स्त्रिया या आयुष्यातील खऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांचे मन ओळखणे कठीण असते. मात्र, त्यांच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे आहे. फक्त महिला दिनाच्या दिवशी नव्हे, तर वर्षभर स्त्रियांना सन्मान मिळायला हवा. संकटांना घाबरून न जाता खंबीरपणे सामोरे जाण्याची ताकद महिलांमध्ये आहे. असे मत व्यक्त करत त्यांनी देखील मी कसे घडले यावर आपल्या बालपणापासून ते राजकीय प्रवासापर्यंत सविस्तर मन मनमोकळे केले.

महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करावी - नगराध्यक्षा सीताताई बनसोड
"स्त्रीला शिक्षणाचा आणि स्वतःच्या अस्तित्वाचा पूर्ण अधिकार आहे. संविधानाने दिलेल्या संधींचा उपयोग करून महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करावी. गर्भाशय हा स्त्रीसाठी अनमोल दागिना आहे, त्यामुळे कोणत्याही न्यूनगंडाशिवाय महिलांनी आत्मविश्वासाने उभे राहायला हवे. असे परखड मत व्यक्त करत केज नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्ष सीताताई बनसोड यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा जीवनपट मनोगतात व्यक्त केला.

या कर्तबगार महिलांचा झाला सन्मान

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, दैनिक समर्थ राजयोग आणि आश्रय सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रीरत्न पुरस्कार - 2025 देऊन उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने प्रमुख आकर्षण असलेल्या सौ. प्राजक्ताताई सुरेश धस, श्रीमती निर्मलाताई खटोड, केज नगरीच्या नगराध्यक्ष सीताताई बनसोड, डॉ. सौ. मीराताई ढाकणे, सौ.चंपावती काकी पानसंबळ, श्रीमती अनिताताई वाघमारे, सौ.जयश्रीताई विधाते, श्रीमती द्वारका कांबळे, सौ.दैवशाला शिरसट, सौ. रुक्मिणी नवनाथ शिराळे, सौ.प्रतिभा शिनगारे, मसरत सुलताना, उम्मेहनी शेख, अरुणा हम्प्रस, मेधा गोसावी आदी महिलांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ, हार,गुलाबाचे झाड देऊन कुटुंबीयांसह मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.



बीड जिल्ह्यात स्त्री जन्मदर वाढला पाहिजे - डॉ. अशोक थोरात
बीड जिल्हा पूर्वी स्त्रीभ्रूणहत्येसाठी कुप्रसिद्ध होता, मात्र आता जन्मदर सुधारत आहे मात्र तो अजून वाढला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबवण्यात येतात.माझा येणाऱ्या 14 मार्च रोजी वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोणीही पुष्पगुच्छ अथवा इतर साहित्य न आणता तेवढ्याच रकमेची साडी भेट म्हणून द्यावी. त्या साडीनेच जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या मातेने मुलींना जन्म दिला त्या मातेला साडी चोळी भेट देऊन सन्मान करण्यात येईल. असे आवाहन करून ते म्हणाले, स्त्रियांना आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी आरोग्य प्रशासन कटिबद्ध आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी