भारतीय स्त्री काल आज आणि उद्या



8 मार्च जसजसा जवळ येऊ लागतो तसतशी हृदयाची स्पंदन अधिक वेगानं वाढू लागतात, एक स्त्री म्हणून जन्मास आल्यावर आपल्यासाठी एखादा ‘महिला दिन’ असतो हाच विचार मुळी माझ्या पचनी पडत नाही. अशोवळी मला मग पोळा या सणाची प्रकर्षानं आठवण येते. पोळ्याच्या दिवशी बघा ना वर्षभर शेतात राबराब राबून घेतलेल्या बैलाला रंगरंगोटी करून मिरवणूक काढून पुरणपोळीचा घास दिला जातो. असं कोड-कौतुक करण्याचा त्याचा हा एकच दिवस! आम्हा महिलांचे देखील असेच काही होत नाही ना? अशी पुसटशी शंका मनात येते. 
भारताने पहिला जागतिक महिला दिन 8 मार्च 1943 रोजी मुंबईत साजरा झाला. स्त्री संघटनांच्या मागण्या या काळानुरूप बदलत गेल्या. आजच्या काळात 8 मार्च महिला दिन जगभरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने साजरा केला जातो, काही देशात हा दिन ‘मातृदिन’ म्हणून साजरा करतात.
रोमानियामध्ये मुले-आई आणि आजीला विविध भेटवस्तू देऊन हा दिवस साजरा करतात. इटलीमध्ये पुरुष महिलांना पिवळ्या रंगाचे फुले देऊन शुभेच्छा देतात. अशा नानाविध पध्दतीने जगात महिला दिन साजरा करण्यात येतो. महिला दिन साजरा करण्याला खरं म्हणजे विरोधच नाही. मात्र केवळ एक दिवसापुरतं ‘स्रीत्व’ हे शक्ती, सहनशीलता, प्रेम, करुणा, काळजी, माया इ. अनेक सद्गुणांचा समुच्च आहे हे मान्य करणं आणि केवळ त्या दिवसापुरता आदर करणे हा महिला दिन असता कामा नये. 
आपल्या भारत देशाचा इतिहास स्त्रियांच्या संदर्भात मोठा गौरवशाली आहे. सुमोर अडीच हजार वर्षापूर्वी प्रथमत: स्त्रीला स्वातंत्र्य दिलं ने तथागत भगवान बुध्दांनी, भारतीय स्त्रीला गुलाम करण्याचा काळ हा पेशवाईचा काळ आहे. स्त्रियांना उपभोग्य वस्तु समाजण्याचा आणि त्यांच्यावर अन्याय अत्त्याचाराची परिसिमा गाढणारा काळ ती पेशवाईच! त्याला जोड होती मनुस्मृतीची. मनुस्मृतीने स्त्रियांना सर्व प्रकारची स्वातंत्र्य तर नाकारलीचं त्यातच मनुस्मृतीने स्त्रीयांना शिक्षणास बंदी घातली होती. 
आजही धर्माच्या नावाखाली जेव्हा मनुस्मृतीनं केलेले कायदे चांगले आहेत असा माझ्या माय भगिनींचा सूर उमटतांना ऐकु येतो तेंव्हा खंत वाटते. 
क्रांतीसूर्य म. जोतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जर जन्मास आलेच नसते तर आम्हा भारतीय स्त्रियांचे काय झाले असते? हा मोठा गहण प्रश्न आहे. स्वतःच्या आयुष्याला डावावर लावून तत्कालीन समाजाशी झुंज देत त्यांनी स्त्रीमुक्तीची चळवळ उभारली. त्यातूनचं आम्ही स्वतंत्र झालो आणि शिक्षित झालो. सावित्रीमाईंना जी सुशिक्षित स्त्री अपेक्षित होती ती अद्याप तशी घडलेली दिसून येत नाही. बंडखोर क्रांतीकारी सावित्रीमाई आम्हाला खरचं कळल्या का? आजमितीला आम्ही विविध क्षेत्रात शिक्षणामुळे काम करू लागलो. उच्चपद भूषवू लागलो पण पण फसव्या चुकीच्या रूढी परंपरांना नाकारण्याचं धाडस आजही आमच्यात नाही. सावित्रीमाईंच्या कृपेमुळे आमचे जीवनमान सुधारले मात्र समाजातील इतर स्त्रियांच्या दु:ख वेदना भाटी किती वाटून घेतो? त्यांच्या प्रगतीसाठी आम्ही आमचे काही योगदान देतोय का? हा शोध घेणे गरजेचे आहे,
सावित्रीमाईनं स्त्रियांच्या प्रश्नाला हात घालण्याचं धाडसी काम केलं. बालहत्या प्रतिबंधक गृह असेल, विधवा पुनर्विवाह असेल, अंतरजातीय विवाह असेल, केशवपण असेल इ. प्रश्नांसाठी त्या झगडल्या. सावित्रीमाईंचे वारसदार म्हणून घेताना आज आपल्याला सद्यस्थितीला स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करावे लागणार आहे. स्त्री उद्धारासाठी राजाराममोहन रॉय, महर्षी धोंडो केशव कर्वे, यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वाची पाऊले उचलली. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटेनत स्त्रियांना एक पंचसूत्री दिली यामध्ये 
1) स्त्री पुरुष समानता
2) स्त्रियांना शिक्षणाचाअधिकार 
3) संपत्तीची निर्मिती 
4) आंतरजातीय विवाह
5) व्यवस्थेची चिकित्सा करणे
इ. बाबींचा समावेश होतो. स्त्रीयांच्या बाबतीत बाबासाहेब नागपूरच्या भाषणात म्हणाले होते की, ज्या समाजात स्त्रीया पुढे तो समाज पुढे असतो. यासोबतच ‘कोणत्याही देशाची किंवा समाजाची प्रगती मोजायची असेल तर ती स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजली पाहिजे’ असं बाबासाहेब म्हणतात.
थोडक्यात आमच्या या उध्दारकार्याच्या आमच्या सक्षमीकरणाबद्दल असणार्‍या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता आमची आहे. त्यामुळे नव्यानं या महिला दिनाच्या निमित्तानं आम्ही या बाबी समजून घेणं गरजेचे आहे, 
मुस्लिम त्रियांच्या बाबतीत बाबासाहेब चिंताव्यक्त करताना म्हणतात"Muslim women in the India is the most helpless women in the world."
आजकाल स्त्रीयांवरी अत्याचारात वाढ होतांना दिसतेय. यासाठी आपण जिजाऊंची शिकवण आपल्या मुलींना देणं गरजेचे आहे. परस्त्री माते समान हा संस्कार जिजाऊ मासाहेबांनी शिवरायांत रुजवला. तशी आई आपण होण्याची गरज आहे. जिजाऊंनी शस्त्र हाती घेतलं तसं स्व-संरक्षणासाठी स्त्रियांनी सक्षम झालं पाहिजे, आत्मनिर्भर होण्यासोबत महिलांनी धाडसी होणं जरुरी आहे. 
आधुनिकतेच्या नावाखाली आणि मिळालेल्या स्त्री स्वातंत्र्याचा उपभोग घेताना आम्ही आमच्या संस्कृतीला धक्का लागेल असे तर करत नाहीत ना? याचा विचार होणं गरजेचं आहे, स्त्रियांविषयी कायदे कडक असल्याकारणाने एखादी स्त्री त्याचा गैरवापर करतानाचे चित्र आज समाजात दिसून येते. स्त्रियांवरच्या अन्याय अत्याचाराला प्रतिबंध असला पाहिजे हे जितके खरे तसे एखाद्या स्त्रीने मनासारखे काही होत नाही म्हणून सासरच्यावर 498 कलमाचा गैरवापर करतांनाच्या केस उजेडात येताना दिसतात. ही गोष्ट चुकीची आहे, याचा देखील विचार या महिलादिनाच्या निमित्ताने होणे गरजेचे आहे.
 ‘पत्नीपीडित’ पुरुष संघटनांचा जन्म होवू लागला तो का म्हणून? याचा देखील विचार आम्हाला करावा लागणार आहे, आमची भारतीय समाजव्यवस्था मुळात एकांगी विचार करणारी आहे. त्याऐवजी आमच्या महापुरुषांना अभिप्रेत असणारी स्त्री-पुरुष समानता जर इथे रुजली तर बर्‍याचसे प्रश्न सुटलेले असतील. 
‘एका यशस्वी स्त्रिच्या मागे एक पुरुष असतो’, हे आशादाची चित्र आज समाजात निर्माण होवू लागलं आहे. म्हणून प्रत्येक मुलींनी स्त्रीने, शिक्षण, अर्थार्जन करताना एकमेकीच्या मागे खंबीरपणे उभं रहाण्याची आवश्यकता आहे, आज आपल्या वाढ्याला जे स्त्रीमुक्तीचं स्वातंत्र्य आले आहे त्याचा उपयोग करून समस्त स्री-विकासासाठी कटिबद्ध असणे महत्वाचं आहे, अजूनही आमचे प्रश्न सुटलेले नाही. अजूनही आम्हाला न्याय मिळत नाही, अन्याय आत्याचार थांबत नाही म्हणून एकजुटीने महिलांनी लढा उभारावा लागणार आहे. 
आमच्या प्रश्नांशी आता आम्हालाच भिडावे लागणार आहे. आम्ही सुधारित होताना इतर भगिनींची सुधारणा कशी होईल हे देखील डोक्यात घ्यावे लागणार आहे. 
8 मार्च 1908 ला न्यूयॉर्क ला महिला कामगारांनी उभारल्या लट्यात मनदानाचा हक्क मिळावा, अशी एक मागणी होती, त्यांना मनदानाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागले, आता भारतीय स्त्रियांना संविधानान मतदानाचा अधिकार दिला, न लढताच तो मिळाल्यानं त्यांचे मूल्य आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि या मताधिकाराचा जबाबदारीनं वापर केला पाहिजे. अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी आमच्या बाबतीतल्या समजून उमजून घेऊन पुढे वाटचाल करावी लागणार आहे. येणार्‍या काळात राजकारणात उद्योग जगतात स्वतंत्र ठसा उमटवणारी सक्षम स्त्री निर्माण करावी लागणार आहे. तेव्हा कुठे खर्‍या अर्थानं महिला दिन साजरा होईल. सोबतच जिजाऊ सावित्री, अहिल्यादेवी, रमाई, लक्ष्मीबाई, भाऊराव पाटील यांच्या वारसदार होवू या. येणार्‍या काळात शास्त्रज्ञ नेव्ही, पोलिस, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, अधिकारी, आमदार-खासदार, मंत्री या पदांवर अधिक संख्येने विराजमान होवूया. 

आपल्या शोषणाविरुद्ध लढू आणि नव्याने घडू. 
एकमेकींना सन्मान देवू. 
उंच आकाशी गगन भरारी घेवू. 
तुझे तुलाच सारे ठरवायचे आहे 
स्वत: प्रकाशात झळकायचं आहे” 

श्रीमती माया श्रीराम सोनवणे-दिवाण
राजर्षी शाहू कन्या विद्यालय बीड, 
फोन ने 9309772056



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी