बीड जिल्हा वकील संघाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा शानदार शुभारंभ
बीड जिल्ह्याची बदनामी थांबवण्यासाठी वकील मंडळीने पुढाकार घ्यावा - न्यायमूर्ती संतोष चपळगावकर
बीड जिल्हा वकील संघाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा शानदार शुभारंभ
बीड प्रतिनिधी
बीड जिल्हा हा गुणवंतांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याने कलाक्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, प्रशासकीय पातळीवर तसेच न्यायिक क्षेत्रामध्ये एवढेच नव्हे सर्वच क्षेत्रामध्ये यशस्वी गरुड झेप घेतलेली आहे. स्नेहभाव जपणारा जातीय सलोखा जोपासणाऱ्या या बीड जिल्ह्याला जर कोणी बदनाम करत असेल तर हे थांबवण्याची जबाबदारी प्रत्येक बीडच्या भूमिपुत्राची आहे. बिघडलेले हे वातावरण पुन्हा एकदा चांगले करण्यासाठी प्रामुख्याने आता वकील मंडळींनी पुढाकार घ्यावा असे भावनिक आवाहन बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संतोषजी चपळगावकर यांनी बीड जिल्हा वकील संघाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात केले.
बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे बीड जिल्हा वकील संघाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संतोष चपळगावकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलाने झाले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आनंद यावलकर साहेब तसेच प्रथम जिल्हा न्यायाधीश सुरेखा पाटील मॅडम यांच्यासह बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड रोहिदास येवले, सचिव अँड सय्यद यासेर पटेल यांची प्रमुख उपस्थिती व्यासपीठावर होती.
या कार्यक्रमासाठी सर्व न्यायिक न्यायमूर्ती, ज्येष्ठ विधीज्ञ, वकील बांधव, भगिनी त्याचबरोबर वकील संघाचे उपाध्यक्ष अँड अविनाश गडगे, अँड नितीन वाघमारे, सहसचिव अँड श्रीकांत जाधव, कोषाध्यक्ष अँड धनंजय गिराम, ग्रंथपाल सचिव अँड भीमा जगताप, महिला प्रतिनिधी अँड छाया वाघमारे यांच्यासह वकील संघाचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना न्यायमूर्ती संतोषजी चपळगावकर साहेब म्हणाले, मी बीड जिल्ह्याच्या भूमीमध्ये घडलो. बीड वकील संघाचा सदस्य ते बीड जिल्हा न्यायालयामध्ये मी काम केले याचा मला अभिमान आहे. बीड जिल्ह्याने सर्वाधिक न्यायमूर्ती दिले याचा मला सर्वाधिक स्वाभिमान आहे. बीड जिल्हा वकील संघाने मला आज या कार्यक्रमासाठी बोलावले उद्या महाशिवरात्र असली तरी हायकोर्ट सुरू आहे. तरी देखील मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे. बीड जिल्ह्यातील कोणतेही न्यायिक प्रश्न असो जे माझ्या कक्षेत सोडवण्यासारखे असतील ते निश्चित सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. आज न्यायालयाच्या क्षेत्राबाहेर स्वतंत्र नाट्यगृहात वकील संघाचा स्नेहसंमेलन सोहळा होत आहे हे वेगळेपण मला भावले. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या. न्यायिक कार्य करणाऱ्या वकील बांधव आणि भगिनी मध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वकील संघाने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. बीडचा बाणा हा क्रीडापटू असलेल्या वकील बांधवांनी मैदानावर गाजवावा आणि बीड जिल्ह्याचे नाव उज्वल करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले बीड जिल्ह्यातील माणसे प्रेमळ आहेत. सर्व जाती धर्मामध्ये स्नेहपूर्व भाव आहेत. मात्र काही स्वार्थापोटी राजकीय वातावरणामुळे बीड जिल्ह्याचे सामाजिक स्वास्थ्य आज बिघडले आहे. बीडला जर कोणत्या अधिकाऱ्याची बदली झाली तर ती बदली शिक्षा म्हणून पाहिली जात आहे. याचा मनाला खेद वाटतो. बिघडलेली ही परिस्थिती बदलण्यासाठी आता सर्वांनीच एकत्र येऊन या जिल्ह्यातील सामाजिक सलोखा जपण्याची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. प्रामुख्याने मी वकील मंडळींना आवाहन करतो की बिघडलेली ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. न्यायदानाचे काम करणाऱ्या वकिलांनी पुढाकार घेतल्यास परिस्थिती लवकर पूर्ववत होईल असा मला विश्वास आहे. भ्रष्टाचारावर मात करणारे चांगले अधिकारी जर बीडला लाभले तर बीडकर त्यांना डोक्यावर घेतात हे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या बदलीनंतर सर्वांनी अनुभवले आहे. बीड जिल्हा वकील संघाने आज स्नेहसंमेलन सोहळा आयोजित केला आहे. यातून जातीय सलोखा निश्चित वाढेल असा मला विश्वास आहे.अशा सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच वकील संघाने दरवर्षी वेगवेगळ्या विषयावर तज्ञ असणाऱ्या व्याख्यात्यांना देखील बोलवावे. याचा लाभ वकील बांधवांना भगिनींना होईल. चांगल्या लोकांचा संपर्क कसा वाढेल असा प्रयत्न देखील अशा कार्यक्रमातून करण्याचा प्रयत्न करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी आपल्या मनोगत आतून व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये वकील संघाचे अध्यक्ष अँड रोहिदास येवले म्हणाले, मागील काही दिवसांपूर्वी आमचे तीन वकील बांधवांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. वकिलांना अभ्यासाचा, पक्षकारांच्या समस्यांचा त्यांना न्याय देण्यासाठी कराव्या लागणारा संघर्षाचा सर्वाधिक ताण तणाव असतो. त्यामुळेच या ताण तणावातून कुठेतरी विरंगुळा मेळावा. त्यांचे आयुष्य तणावमुक्त राहावे. यासाठीच आम्ही या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन आणि त्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. याला सर्व वकील बांधवांनी उस्फूर्त सहभाग घेऊन पाठबळ दिले याचा मला आनंद आहे.
याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री आनंद यावलकर साहेब म्हणाले, न्यायिक कार्य करणाऱ्या वकील बांधव आणि भगिनी मध्ये अनेक सुप्त कला गुण लपलेले आहेत. त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बीड जिल्हा वकील संघाने केले त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अँड सुरेश वडमारे आणि अँड सारिका जोशी कुलकर्णी यांनी केले. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पहिल्याच शुभारंभ दिनी बीड जिल्हा वकील संघाचे सर्व सदस्य सहकुटुंब कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी या कार्यक्रमाची शोभा खऱ्या अर्थाने वाढवली. वकील संघाच्या गायक कलाकारांनी सादर केलेल्या बहारदार गीतांच्या संगीत रजनी कार्यक्रमाने शानदार समारोप झाला.
आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार विजयसिंह पंडित यांनी वकील संघाला दिले एक लक्ष रुपयाची पुस्तके
बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी 50 हजार रुपयांची विविध न्यायिक पुस्तके आणि गेवराई विधानसभेचे आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील 50 हजार रुपयांची न्यायिक पुस्तके बीड जिल्हा वकील संघास भेट म्हणून दिली. आमदारांच्या वतीने अँड दीपक कुलकर्णी आणि अँड आनंद पाटील यांनी प्रतिनिधिक स्वरूपात ही पुस्तके न्यायमूर्तींच्या साक्षीने व्यासपीठावर बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड रोहिदास येवले यांच्याकडे सुपूर्द केले.
विजेत्या वकिलांचा न्यायमूर्तींच्या हस्ते सन्मान
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये प्रथम,द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ बक्षीसास पात्र ठरलेल्या वकील बांधव आणि भगिनी यांचे सन्मानपत्र सन्मानचिन्ह न्यायमूर्तींच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
आज शेलापागोटे आणि शॉर्ट फिल्म तर उद्या संगीत रजनीने होणार समारोप
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी 6:30 वाजता जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर साहेब यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. यानंतर शेलापागोटे, नाटक, शॉर्ट फिल्म असे सांस्कृतिक कार्यक्रम होतील तर उद्या 27 फेब्रुवारी गुरुवार रोजी स्नेहसंमेलनाचा समारोप वकील संघाच्या गायक कलाकारांनी सादर केलेल्या बहारदार गीतांच्या संगीत रजनी कार्यक्रमातून सायंकाळी सात वाजता होईल. या कार्यक्रमाचा शुभारंभ सायंकाळी 6.30 वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद यावलकर साहेब आणि पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. वकील संघाच्या स्नेहसंमेलन निमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून वकील बांधव भगिनी त्यांच्या कुटुंबीयांनी आणि पक्षकरांसह वकील प्रेमी नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बीड जिल्हा वकील संघाच्या वतीने अध्यक्ष अँड रोहिदास येवले यांनी केले आहे.
बाहेरच्या मीडियाने बीड जिल्ह्याला जास्त बदनाम केले
त्या घटनेवरून बाहेरच्या मीडियाने बीड जिल्ह्याला सर्वाधिक बदनाम केले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील पत्रकार बांधव आणि मीडियातील प्रतिनिधींनी बीड जिल्ह्याची किमान यापुढे तरी आता बदनामी होऊ नये यासाठी पुढे यावं आणि हे वातावरण बदलण्यासाठी सकारात्मक लेखणी उचलावी. हा विषय अजून जास्त संवेदनशील होऊ नये याची दक्षता मीडियाने घ्यावी असे खुले आवाहन मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती संतोषजी चपळगावकर यांनी केले.
Comments
Post a Comment